मॉडेलवर आली कॉलेजबाहेर चहा विकण्याची वेळ; जिद्दीने लढतेय आयुष्याचा संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 15:15 IST2022-10-29T15:13:00+5:302022-10-29T15:15:31+5:30

एक प्रसिद्ध शायरी आहे, मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, गोरखपूरमध्ये राहणाऱ्या सिमरन गुप्ता नावाच्या मुलीला ही तंतोतंत लागू होते. सिमरन गुप्ता हिने मिस गोरखूपर किताब जिंकला आहे.
अनेक जाहिरातीत सिमरननं काम केले आहे. परंतु कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यासाठी सध्या तिच्यावर चहा विकण्याची वेळ आलीय. आणि हे काम करताना ती पूर्ण मेहनतीनं आणि आवडीने करत आहे. एकदिवस आकाशाला गवसणी घालण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होणार असा तिला विश्वास आहे.
गोरखपूरमध्ये रस्त्याच्या कडेला चहाची टपरी चालवणारी ही मुलगी पाहून तुम्हाला वाटणार नाही की ती चार वर्षांपूर्वी सेलिब्रिटी होती. २०१८ मध्ये सिमरन गुप्ताच्या डोक्यावर मिस गोरखपूरचा ताज चढला होता. त्यानंतर ती नव्या पिढीसाठी आदर्श ठरली.
सिमरन अजूनही रोल मॉडेल आहे. आपल्या दिव्यांग भावावर उपचार करता यावेत म्हणून ती मॉडेल चायवाली या नावाने स्वतःचा चहाचा स्टॉल चालवते. संघर्ष आणि अतूट धैर्याच्या बळावर आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
सिमरन ही गोरखपूरमधील सूर्यकुंडची रहिवासी आहे. वडील राजेंद्रकुमार गुप्ता खासगी नोकरी करून कुटुंबाचा खर्च चालवतात. सिमरनचा भाऊ दिव्यांग आहे. ग्रॅज्युएशननंतर सिमरन गुप्ताने मिस गोरखपूर स्पर्धेत भाग घेतला आणि तिने हा किताब पटकावला.
यानंतर तिच्या स्वप्नांना आणि करिअरलाही पंख लागले. सिमरनने अनेक जाहिरातींमध्येही काम केले. पण यानंतर त्यांच्या आयुष्यात कोरोनाचं ग्रहण आलं. तिला मॉडेलिंगचे काम मिळणे बंद झाले. भावाच्या आजारपणामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्याने घरही विकले गेले.
सिमरनचं कुटुंब भाड्याच्या घरात राहू लागले. सिमरननेही एका ठिकाणी कंत्राटी नोकरी केली, पण अनेक महिने पगार मिळाला नाही. यानंतर सिमरनने चहाचे स्टॉल लावायला सुरुवात केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सिमरन दररोज सुमारे २५०-३०० कप चहा विकते.
गोरखपूरच्या राणी लक्ष्मीबाई कॉलेजबाहेर ती मॉडेल चायवाली नावानं दुकान चालवते. सिमरननं बनवलेल्या मसाला चहासाठी लोकांची रांग लागलेली असते. सकाळी ६ वाजता सिमरन दुकान उघडते. संध्याकाळी ६-७ पर्यंत दिवसभर ती चहा विकते.
सिमरन एका चहाच्या कपासाठी १० रुपये घेते. मिस गोरखपूर राहूनसुद्धा चहा विकताना कुठलाही कमीपणा सिमरन घेत नाही. माझ्या या उद्योगाला मोठं स्वरुप मिळावं यासाठी सरकारी मदत आणि कर्ज मिळावं अशी सिमरनची इच्छा आहे. सिमरनच्या या कामाला तिच्या कुटुंबाकडूनही पाठिंबा मिळतो.
या पैशातून ती तिच्या दिव्यांग भावावर उपचार करते. कुटुंबाला मदत करते. सिमरन म्हणते की, कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. कुठले काम झोकून देऊन आणि मेहनतीने केले तर यशाने गगनाला भिडता येते. चहाची टपरी चालवत असली तरी सिमरनने मॉडेलिंगचे स्वप्न सोडलेले नाही. एक दिवस तिची स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील याची तिला खात्री आहे.