शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेलं अँटी-एजिंग ट्रीटमेंट नेमकं काय आहे? कितपत सुरक्षित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:18 IST2025-07-03T17:02:13+5:302025-07-03T17:18:29+5:30

Botox Anti Aging Benefits And Risks: अनेक अभिनेत्री अँटी एजिंग ट्रिटमेंट घेतात. पण, सहसा उघडपणे मान्य करत नाहीत.

'कांटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिचा २७ जूनला संध्याकाळी मुंबईत मृत्यू झाला. ती ४२ वर्षांची होती. शेफालीच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अभिनेत्रीच्या अचानक मृत्यूने विविध चर्चांना उधाण आलंय.

पोलिसांनी अभिनेत्रीच्या घरी अँटी-एजिंग औषधे मिळाली आहेत. ती गेल्या काही वर्षांपासून अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत होती. अँटी एजिंग ट्रीटमेंट ही तिच्या मृत्यूला कुठेतरी कारणभूत असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे शेफालीच्या मृत्यूनंतर आता अँटी-एजिंग ट्रीटमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

कॉस्मेटिक सर्जरीबाबत अभिनेत्री करीना कपूरचं (Kareena Kapoor View On Anti Aging Treatment) एक जुनं विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलाखतीदरम्यान करीनाने ती बोटॉक्स ट्रीटमेंटच्या पूर्णपणे विरोधात असल्याचं म्हटलं होतं.

यासोबतचं अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat View On Anti Aging Treatment) इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आणि चाहत्यांना 'निरोगी जीवनशैली' स्वीकारण्याचा सल्ला दिला.

अशावेळी हे अँटी-एजिंग ट्रीटमेंट (What Exactly Is Anti-aging Treatment?) नेमकं काय असतं? यामध्ये काय प्रक्रिया केली जाते? आणि सर्वात महत्त्वाचं हे उपचार कितपत सुरक्षित असतात? हे जाणून घेणं गरजेचं ठरतं.

अँटी-एजिंग ट्रीटमेंटमध्ये सर्वात जास्त प्रचलित म्हणजे बोटॉक्स ( Botox Treatment) आहे, जो एक शक्तिशाली इंजेक्शन आहे. दैनिक जागरणच्या रिपोर्टमधील क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, बोटॉक्स हे बोटुलिनम टॉक्सिन नावाच्या औषधापासून बनवले जातं. स्नायूंना लवचिक बनवण्याचं काम देखील करतं. ते कॉस्मेटिक सर्जरी आणि वैद्यकीय दोन्हीमध्ये वापरले जातं. त्यामुळे सुरकुत्या कमी होतात. मायग्रेनसारख्या डोकेदुखीपासून आराम देण्यासाठी देखील ते प्रभावी आहे. त्याचा प्रभाव काही महिने टिकतो. त्यानंतर ते हळूहळू कमी होतं. बोटॉक्स हे भुवयांच्या दरम्यान, कपाळावर, नाकाजवळ, डोळ्यांच्या बाजूला, ओठ, हनुवटी, मान या ठिकाणी केलं जातं.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, सुमारे २० वर्षांपूर्वी ‘फूड अँड ड्रग्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (FDA) ने सौंदर्यवर्धक प्रक्रियांमध्ये बोटॉक्सच्या वापरास मान्यता दिली होती. 'द एस्थेटिक क्लिनिक्स'चे सीनियर कॉस्मेटिक सर्जन डॉ. देबराज शोम यांनी हिंदी न्यूज वेबसाइट 'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, 'डर्मल फिलर्स' हे इंजेक्शन स्वरूपात असतात, जे थेट त्वचेमध्ये दिले जातात. हे फिलर्स त्वचेतील पेशींमध्ये नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या पदार्थापासून केले जातात. डॉ. शोम यांच्या मते, वयानुसार आपल्या त्वचेमधील कोलेजनचं प्रमाण कमी होत जातं. पण फिलर्सच्या मदतीने त्वचेमध्ये पुन्हा कोलेजन भरता येतं, ज्यामुळे चेहरा तरुण आणि ताजातवाना दिसतो.

अँटी-एजिंगसाठी अनेकजण ग्लुटाथायोन इंजेक्शनचाही वापर करतात. हे एक अँटीऑक्सिडंट आहे, जे शरीरातील पेशींना होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्याचे काम करते. ग्लुटाथायोन प्रामुख्याने इंट्राव्हेनस (IV) इंजेक्शन आणि गोळ्यांद्वारे (टॅबलेट्स) घेतलं जातं. ग्लुटाथायोन आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या आधीपासूनच असतं. मात्र वाढत्या वयानुसार शरीरातील ग्लुटाथायोनचं उत्पादन कमी होतं. त्यामुळे ते इंजेक्शन आणि गोळ्यांद्वारे घेतले जातात. असंही मानलं जातं की ग्लुटाथायोन घेणाऱ्या व्यक्तींच्या त्वचेच्या रंगामध्ये थोडा उजळपणा आणि चमक दिसून येते. पण त्याचे दुष्परिणाम आहेत. आयव्ही ग्लुटाथिओनला एफडीएने मान्यता दिलेली नाही.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना, दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील त्वचाविज्ञान विभागाचे अध्यक्ष डॉ. ऋषी पराशर म्हणतात, "काही अपवाद वगळता, अशी इंजेक्शन्स आतापर्यंत सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती नोंदणीकृत त्वचारोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली घ्यावीत".

फिल्म इंडस्ट्रीत अशा अँटी-एजिंग ट्रीटमेंट घेणं सर्वसामान्य झालं आहे. अनेक अभिनेत्री हे उपचार घेतात. पण, सहसा उघडपणे मान्य करत नाहीत. पण, काही अशाही अभिनेत्री आहेत, ज्यांनी अशा ट्रीटमेंट घेतल्याचं उघडपणे मान्य केलंय. अभिनेत्री तृप्ति डिमरी, मौनी रॉय, जान्हवी कपूर, अनन्या पांडे आणि खुशी कपूर यांनी अशा ट्रीटमेंट घेतल्याचं बोललं जातं.

अलिकडेच एका मुलाखतीमध्ये मुमताज यांनी (Mumtaz on Anti-aging Treatment) ४ महिन्यांतून एकदा फिलर्स केल्याचं कबूल केलं होतं. त्या म्हणाल्या, "मी कधीही फेसलिफ्ट केले नाही, पण जेव्हा मी खूप थकते, तेव्हा मी चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंचे फिलर्स नक्कीच करते, ते एक ते दोन महिने टिकते, मी ते चार महिन्यांच्या अंतराने करते, पण मला आतापर्यंत प्लास्टिक सर्जरीची गरज भासली नाही".