'अनन्या' सिनेमासाठी मला वाईट पद्धतीने रिजेक्ट केलं गेलं; ऋतुजा बागवेने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 12:39 IST2025-11-16T11:56:20+5:302025-11-16T12:39:39+5:30
रवी जाधव आणि प्रताप सरांना..., ऋतुजा बागवे स्पष्टच बोलली

अभिनेत्री ऋतुजा बागवे आज अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते. नुकतीच ती 'माटी से बंधी डोर' या हिंदी मालिकेत दिसली.

ऋतुजा करिअरची सुरुवात नाटकांपासून केली. २०१५ साली तिला 'नांदा सौख्य भरे' ही मालिका मिळाली. नंतर तिने 'तू माझा सांगाती'मालिका केली.

ऋतुजाला खरं यश मिळालं ते 'अनन्या' नाटकामुळे. या नाटकातून तिने अप्रतिम अभिनयाचं दर्शन घडवलं. या नाटकासाठी तिला तेव्हाचे सगळेच अवॉर्ड्सही मिळाले होते.

ऋतुजाने अनन्यासाठी खूप मेहनत घेतली होती. दिव्यांग मुलीची भूमिका साकारताना ती खरोखर पायाने सगळ्या गोष्टी करण्याचा सराव केला होता आणि ती यशस्वीही झाली.

मात्र याच नाटकाचा सिनेमा होताना तिला रिजेक्ट केलं गेलं. त्यावर ऋतुजा नुकतंच मनापासून बोलली. भार्गवी चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीत तिने प्रतिक्रिया दिली.

ऋतुजा म्हणाली, "अनन्या सिनेमात मी का नव्हते हे रवी जाधव आणि प्रताप सरांना विचारलं पाहिजे. मला रिजेक्ट केलं याचा मला राग आला नाही. वाईटही वाटलं नाही. पण रिजेक्शनची पद्धत मनाला लागणारी होती."

"ती पद्धत जरा नीट, समजूतदार पद्धतीने करता आली असती. नाटकाचा सिनेमा होताना तुमची जी निवड असेल ती तुम्ही घ्यावीच. पण माझी कमी दाखवण्याची काहीच गरज नव्हती जे काही घटनांमधून केलं गेलं. त्या घटना बोलून दाखवण्याची गरज नाही.

"हृताने उत्तमच काम केलं. ती भूमिका तिच्या वाट्याला आली हे तिचं नशीब आहे. सगळं श्रेय तिचं आहे. तिने छानच काम केलं.मी स्वत: हृताला फोन करुन तिचं अभिनंदनही केलं होतं. काही गरज लागली तर सांग असंही म्हटलं होतं."

"बरेचदा काय होतं ना रिजेक्शनची कोणाला भीती वाटत नाही पण त्याची पद्धत महत्वाची असते. जे बरेचदा मी अनुभवलं आहे. ही गोष्ट इंडस्ट्रीत जरा सुधारायला हवी. इंडस्ट्रीला ही गोष्ट कळली पाहिजे."

"मी इतकी समजूतदार आहेच की कमर्शियली काम करताना हे लक्षात घ्यावं लागतं की कुठला चेहरा किती पैसा कमवून आणू शकणार आहे. त्यामुळे मला हे सगळं माहित होतं फक्त मला रिजेक्ट करताना जी पद्धत वापरली गेली ती वाईट होती. माणूसकी दाखवली पाहिजे होती."

















