मराठी मालिकेतले 'अप्पा' ते हिंदी सिनेमे गाजवणारे अच्युत पोतदार; वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:47 IST2025-08-19T12:02:45+5:302025-08-19T12:47:42+5:30

फक्त '३ इडियट्स'च नाही, तर या प्रोजेक्ट्समधूनही अच्युत पोतदार यांनी अभिनयाची छाप पाडली.

'३ इडियट्स' सिनेमात 'अरे कहना क्या चाहते हो?' हा डायलॉग गाजला. ते अभिनेते अच्युत पोतदार (Achyut Potdar) यांचं वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं. ठाणे येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

अच्युत पोतदार यांची ओळख केवळ ३ इडियट्स पुरती नाही. तर त्यांची सिनेविश्वात आणि मनोरंजनसृष्टीच्या बाहेरही मोठी कारकीर्द राहिली आहे. मराठी नाटक, मालिका, हिंदी सिनेमा, जाहिराती अशा प्रत्येक माध्यमात त्यांनी काम केलं.

त्यांची सुरुवात मात्र अभिनयापासून झालेली नाही. १९६२ ते १९६७ या काळात ते भारतीय सैन्यात होते. १९६७ साली ते कॅप्टन पदावर निवृत्त झाले. नंतर त्यांनी इंडियन ऑइलमध्ये २५ वर्ष काम केलं आणि १९९२ साली निवृत्त झाले.

अभिनय हा त्यांचा छंद होता जो त्यांनी नंतर जोपासला. त्यांनी १२५ हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. ९५ मालिका, २५ नाटकांमध्येही भूमिका साकारल्या.

झी मराठीवरील लोकप्रिया मालिका 'माझा होशील ना'मध्ये त्यांनी अप्पा ही भूमिका साकारली होती. 'जीवाची होतिया काहिली' या मालिकेत ते नंतर दिसले. २०२१ साली त्यांना झी मराठी जीवन गौरव पुरस्कारही मिळाला.

'मिसेस तेंडुलकर', 'अगले जनम मोहे बिटिया ही किजो','वागळे की दुनिया','ये दुनिया गजब की' या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका. दूरदर्शनवरीलही अनेक मालिकांमध्ये ते दिसले.

'फेरारी की सवारी', 'दबंग २', 'भूतनाथ', 'लगे रहो मुन्नाभाई', 'परिणीता', 'वास्तव', 'इश्क', 'उडान', 'विजेता', 'रंगीला' आणि त्यांच्या अशा अनेक सिनेमांची नावं घेऊ तितकी कमी आहेत.

दोन दिवसांनी अच्युत पोतदार यांचा वाढदिवस होता. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांची ही कारकीर्द अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.