अभिनयाचा हिमालय सह्याद्रीसमोर झुकतो तेव्हा....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 09:35 AM2021-09-23T09:35:01+5:302021-09-23T09:50:14+5:30

अमिताभ यांनी समीर यांच्या कलेचा आदर म्हणून चक्क वाकून नमस्कार केला होता. समीर आणि संपूर्ण टीमसाठी हा अनपेक्षित धक्काच होता. कारण, अभिनयाचा हिमालय चक्क सह्याद्रीसमोर झुकल्याचं पाहायला मिळालं.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम आता घराघरात पोहोचला आहे. तणावतल्या कुटुबीयांना उल्हासित करण्याचं, त्यांच्या तणावाला काही प्रमाणात हलकं करण्याचं काम महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून होतंय.

हास्यजत्रा सध्या तुफान लोकप्रिय बनली आहे. नुकतेच या टीमने बिग बी अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती १३' च्या सेटवर धडक दिली.

महानायक अमिताभ बच्चन यांची भेट झाल्याने सर्वच कलाकार अतिशय आनंदी झाले आहेत. यावेळी अमिताभ यांनी हा कार्यक्रम आवर्जून पहात असल्याचे सांगितल्याने कलाकारांचा आनंद द्विगुणीत झालाय.

महाराष्ट्राच्या हास्यजत्राच्या टीमची आणि अमिताभ बच्चन यांच्या भेटीतील एक क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विनोदवीर समीर चौगुलेंच्या कामाचं अमिताभ यांनी तोंडभरून कौतुक केलं.

अमिताभ यांनी समीर यांच्या कलेचा आदर म्हणून चक्क वाकून नमस्कार केला होता. समीर आणि संपूर्ण टीमसाठी हा अनपेक्षित धक्काच होता. कारण, अभिनयाचा हिमालय चक्क सह्याद्रीसमोर झुकल्याचं पाहायला मिळालं.

अमिताभ यांच्या या कृतीन समीर यांनाही आश्चर्याचा मोठा धक्काच बसला आहे. त्यामुळे, अमिताभ यांच्या भेटीचं वर्णन करताना, समीर यांनी तो क्षण... आयुष्यभर काळजाच्या कुपीत साठवून ठेवण्याचा, असल्याचं म्हटलं.

मेंदूत त्या क्षणाची पर्मनंट “एफडी” करून ठेवण्याचा... खूप वेळ भारावून जाण्याचा.. तो क्षण आपल्या आयुष्यात एकदा तरी येतोच हे काल सिद्ध झालं, असेही समीर यांनी म्हटले आहे.

समीर यांनी आपल्या इंस्टा अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. मात्र, त्यांनी अमिताभ हे आपल्यासमोर आदरार्थी झुकल्याचा फोटो शेअर केला नाही.

समीर हे अमिताभ यांच्या कृतीने भारावुन गेले, तरीही महानायकाचा तोच सन्मान ठेवत त्यांनी आवर्जून तो फोटो शेअर करण्याचं टाळल्याचं दिसून येतं.

समीर यांनी अमिताभ यांच्या जंजीर या चित्रपटाचाही आवर्जून उल्लेख केला आहे. जंजीर चित्रपटाचे प्रदर्शन आणि माझा जन्म एकाच वेळेचा. म्हणूनच जंजीर चित्रपटाला मी माझा जुळा भाऊ मानतो, असेही समीरने म्हटले.