रेल्वे रुळांना वर्षानुवर्षे गंज का लागत नाही? तुम्हाला माहितेय का? त्यामागं दडलंय खास कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 20:47 IST2026-01-05T20:42:30+5:302026-01-05T20:47:15+5:30
आपल्या घरातील लोखंडी वस्तू पावसाळ्यात लगेच गंजतात, पण रेल्वेचे रुळ मात्र वर्षानुवर्षे चकाकत राहतात. यामागे कोणतेही जादू नसून 'विज्ञानाची कमाल' आहे!

भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. आपण सर्वांनी पाहिले असेल की, ऊन, वारा आणि पावसाचा थेट सामना करूनही रेल्वे रुळांना कधीही गंज लागत नाही.

घरातील लोखंडी वस्तू किंवा साधे लोखंड थोडे दिवस बाहेर राहिले तरी त्यावर गंज चढतो, मग रेल्वे रुळांच्या बाबतीत असे का घडत नाही? त्यामागे एक विशेष वैज्ञानिक प्रक्रिया आणि विशिष्ट धातूचे मिश्रण आहे.

अनेक लोकांना असे वाटते, की रेल्वे रुळ साध्या लोखंडाचे बनलेले असतात, परंतु तसे नाही. हे रुळ एका विशेष प्रकारच्या पोलादापासून बनवले जातात, ज्याला 'मँगनीज स्टील' असे म्हणतात. तांत्रिक भाषेत याला 'हॅडफिल्ड मॅंगनीज स्टील' म्हटले जाते.

सामान्य लोखंड जेव्हा हवा आणि आर्द्रतेच्या संपर्कात येते, तेव्हा त्यावर आयर्न ऑक्साईडचा थर जमा होतो, ज्याला आपण गंज म्हणतो. मात्र, रेल्वे रुळांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिश्रणात धारणतः १२ टक्के ते १३ टक्के मँगनीज आणि १ टक्के कार्बन वापर केला जातो.

या मिश्रणामुळे रुळांच्या वरच्या थरावर आयर्न ऑक्साईड तयार होण्याची प्रक्रिया अत्यंत मंदावते. मँगनीजमुळे लोखंडाचा हवेतील ऑक्सिजनशी होणारा संपर्क कमी होतो आणि रुळांना गंज लागत नाही.

शिवाय, रेल्वे रुळांवरून दररोज अनेक गाड्या वेगाने धावत असतात. चाके आणि रुळ यांच्यातील सततच्या घर्षणामुळे रुळांचा वरचा पृष्ठभाग नेहमी घासलेला आणि चकाकणारा राहतो. यामुळे जर थोडाफार गंज तयार झालाच, तर तो गाडीच्या चाकांमुळे निघून जातो.

जर रेल्वे रुळ साध्या लोखंडाचे बनवले आणि त्यांना गंज लागला, तर रुळ कमकुवत होतील. यामुळे रुळांना तडे जाऊ शकतात आणि मोठ्या रेल्वे अपघातांची शक्यता वाढू शकते. म्हणूनच, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि रुळांच्या दीर्घायुष्यासाठी मँगनीज स्टीलचा वापर केला जातो.

Photo Credit: Canva

















