थिएटरमध्ये हॉरर फिल्म पाहात होतं जोडपं, तेवढ्यात झाला गोळीबार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 11:48 PM2021-07-28T23:48:13+5:302021-07-28T23:59:12+5:30

Crime News : घटनेनंतर थिएटरमध्ये पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला, पण हा गोळीबार कोणी आणि कशासाठी केला, हे अद्याप समजू शकले नाही.

कॅलिफोर्नियाच्या थिएटरमध्ये हॉरर फिल्म पाहत असताना एका 18 वर्षीय मुलीची गोळी झाडून हत्या करण्यात आली, तर तिचा मित्र असलेल्या 19 वर्षीय युवक गोळी लागल्याने जखमी झाला आहे.

या घटनेनंतर थिएटरमध्ये पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला, पण हा गोळीबार कोणी आणि कशासाठी केला, हे अद्याप समजू शकले नाही. फिल्ममधील हॉरर सीनदरम्यान जोरात आवाजावेळी गोळीबार झाल्याचे सांगण्यात येते.

कॅलिफोर्नियामधील थिएटरमध्ये सोमवारी ही घटना घडली. 'द फॉरएव्हर पर्ज' हा हॉरर फिल्म पाहण्यासाठी येथे आलेल्या या जोडप्यावर हल्ला झाला.

स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे की, ही घटना रात्री 11.45 वाजता घडली. दोघांवर गोळीबार करण्यात आला, यात मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर युवक गंभीर जखमी झाला.

पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या तरूणाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांची ओळख अद्याप कळू शकलेली नाही. या दोघांची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. तसेच, या घटनेमागील कारण काय होते याचा शोध घेतला जात आहे.

घटनेनंतर तपास करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना अद्याप कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत, जेणेकरून गोळीबार करणाऱ्याबद्दल माहिती मिळू शकेल. पोलीस कोणत्याही प्रकारचे फुटेज जप्त करू शकलेले नाहीत, ज्यामुळे कोणत्याही संशयितांकडे पाहता येईल, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्यामधील नात्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती, परंतु तो गोळीबार तिसर्‍या व्यक्तीने केला होता की आत्महत्येची घटना आहे? हे अद्याप समजू शकलेले नाही. आतापर्यंत पोलिसांना ज्या बंदुकीने गोळीबार करण्यात आला, ती बंदुक सुद्धा सापडली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ सहा तिकिटे विकली गेल्याने हा चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या फारच कमी होती. मात्र, या घटनेसंदर्भात कोणाकडे काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना त्याविषयी माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

'द फॉरेव्हर पर्ज' फिल्म 2048 ची अशी एक कथा आहे, ज्यामध्ये सरकार 12 तासांसाठी सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची परवानगी देण्यात आली आहे. या हत्येलाही या थीमशी जोडले जात आहे, असे सांगण्यात आले आहे.