घरात चाकू घेऊन शिरला अन् महिलेवर केला बलात्काराचा प्रयत्न, संपूर्ण घटना झाली कॅमेरात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 08:02 PM2021-07-02T20:02:48+5:302021-07-02T20:10:51+5:30

जगात अशा अनेक महिला आहेत की ज्या आपल्या राहत्या घरात देखील सुरक्षीत नाहीत. एका महिलेसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

महिला सुरक्षेबाबत केवळ भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांसमोर मोठा प्रश्न आहे. कोलंबियातील एका महिलेला देखील एका धक्कादायक प्रकरणाला सामोरं जावं लागलं आहे. एक अज्ञात इसम या महिलेच्या घरात चाकू घेऊन शिरला अन् महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला.

२५ वर्षीय सारा क्वींटेरो या सायकोलॉजीच्या विद्यार्थींनी आहेत. त्यांना एक लहान मुलगा देखील आहे. उत्तर कोलंबियात अपार्टेडो शहरात त्या आपल्या राहत्या घरात एक व्हिडिओ शूट करण्याची तयारी करत होत्या आणि इतक्यात एक इसम त्यांच्या घरात शिरला. यानंतर सारा आणि या इसमामध्ये झटापट झाली.

सारानं संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओच्या माध्यमांतून घरांत एकट्या राहणाऱ्या महिलांनी जागरुक राहण गरजेचं असल्याचं सारानं म्हटलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमांतून पोलीस संबंधित तरुणाचा शोध घेत आहेत.

एक अज्ञात इसमानं माझ्या घरात शिरुन चाकूचा धाक दाखवून माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण मी त्याचा हिंमतीनं सामना केला. दरम्यान ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली. त्यावेळी मी माझ्या विद्यापीठाच्या एका कामासाठी एक व्हिडिओ शूट करण्याची तयार करत होते, असं सारानं म्हटलं आहे.

घटनेवेळी मुलगा घरात नव्हता ते एक बरं झालं. नाहीतर परिस्थिती आणखी चिघळली असती आणि मला स्वत:सोबतच मुलाचीही सुरक्षेसाठी झटावं लागलं असतं, असंही सारा म्हणाल्या. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार चाकूहल्ला करणारा तरुण २२ वर्षीय असून त्याच्यावर एका मानसिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्लेखोर तरुण बायपोलर डिसऑर्डरसारखा गंभीर मानसिक आजाराशी सामना करत आहे असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

देवाच्या कृपेनं हल्लेखोराच्या तावडीतून मी सुखरुप सुटले. मी त्याला धक्का मारुन जीन्यांवरुन खाली पाडलं. कृपया या तरुणाचा शोध घेण्यासाठी माझी मदत करा. यानं केलेल्या कृत्याबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असं सारा यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिलं होतं.

हल्लेखोर तरुण मानसिक रुग्ण असल्याचं मला कळालं आहे. जर असं काही असेल तर जास्त काहीच करता येणार नाही. पण हा व्हिडिओ पाहून प्रशासन योग्य ती कारवाई करेल, अशी आशा आहे. दरम्यान याप्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.