विनोद कांबळीचा वाचवला होता जीव; वाचा, कोण आहेत ACB ने अटक केलेल्या सुजाता पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 04:51 PM2021-10-08T16:51:35+5:302021-10-08T21:50:29+5:30

Sujata Patil : मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली आहे. सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. एसीबीने कार्यालयात सापळा रचून सुजाता पाटील यांना बेड्या ठोकल्या आहे. कोण आहेत सुजाता पाटील पाहुयात

२०१३ साली माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यावेळी तो पूर्वद्रुतगती महामार्गावरून गाडी चालवत होता़ वेळीच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने विनोदचे प्राण वाचले होते. त्याचा जीव वाचविण्याचे श्रेय सुजाता पाटील या माटुंगा वाहतूक पोलीस विभागातील निरीक्षक आणि कुमारदत्त शिंदे या हवालदाराच्या प्रसंगावधानाला जाते.

पाटील २०१२ साली आझाद मैदानात झालेल्या हिंसाचारावर कविता केल्याने टीकेचे लक्ष्य बनल्या होत्या. आझाद मैदानात झालेल्या हिंसाचारावर सुजाता पाटील यांनी ‘दक्षता’मध्ये कविता लिहिली होती. या कवितेवरून त्या टीकेचे धनी बनल्या होत्या.

पोलिस कोठडीत हत्या झालेल्या मृत अनिकेत कोथळे याची तीन वर्षांची मुलगी प्रांजल हिचे पालकत्व स्वीकारलेल्या सुजाता पाटील यांना एसीबीने अटक केली आहे.

हिंगोली येथील पोलिस उपअधीक्षक (गृह) म्हणून पाटील कार्यरत असताना प्रांजलच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च त्यांनी उचलला आहे.

शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला अनिकेत कोथळेला लुटमारीच्या गुन्ह्यात अटक केली. गुन्हा कबूल करण्यासाठी त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मी सांगली पोलिस कोठडीमध्ये मृत अनिकेत कोथळे यांची तीन वर्षांची मुलगी दत्तक घेतली असून मला तीन मुलं आहेत माझी मुलगी सतरा वर्षांची आहे. माझी मुले मुंबईत शिक्षण घेत असून त्यांना रस्त्यावर मुंबई सोडून मी 16 तास प्रवास करुन हिंगोलीमध्ये नोकरी करत आहे. माझ्या नंतर बदली झालेले अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर न होता त्यांच्या सोयीनुसार बदल्या दोन -तीन महिन्यांमध्ये परत मुंबईमध्ये करण्यात आल्या, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.

पाटील सकाळी चेंबूर-सोमय्या मैदान येथील हायवे अपार्टमेंटजवळ तैनात होत्या. त्यांच्यासोबत त्या वेळेस हवालदार कुमारदत्त शिंदेही होते. साडेनऊच्या सुमारास अचानक एक गाडी शिंदे उभे असलेल्या जागी येऊन थांबली. गाडी चालविणारी व्यक्ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती. तसेच ती शिंदे यांच्याकडे मदतीसाठी धावा करीत होती. त्यांनी जवळ जाऊन पाहिले तेव्हा आतमध्ये विनोद कांबळी होता आणि त्याला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता.

शिंदे यांनी लगेचच जवळच असलेल्या पाटील यांना बोलावून घेतले. पाटील यांनी तातडीने सूत्रे हाती घेतली. आपल्या छातीत दुखत असल्याचे विनोदने कसेबसे त्यांना सांगितले. तो पूर्णपणे घामाघूम झाला होता आणि त्याची तब्येत ढासळत चालली होती. प्रसंगावधान बाळगत पाटील यांनी तात्काळ त्याला लीलावती रुग्णालयात नेले. आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत डॉक्टरांनीही विनोदवर उपचार करण्यास सुरुवात केली. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. त्याची तब्येत स्थिरस्थावर होईपर्यंत पाटील तिथेच होत्या.