गोगामेडी यांची हत्या करणारा शूटर भारतीय सैन्यात जवान; लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने आलेला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 01:11 PM2023-12-06T13:11:53+5:302023-12-06T13:19:00+5:30

हत्या प्रकरणात सैन्याशी नाव जोडले गेल्याने पोलीस या प्रकरणात काही बोलण्यास तयार नाहीएत.

करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या करणारा शूटर हा भारतीय सैन्यदलात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी आले होते. य़ावेळी त्यांनी गोगामेडी यांना गोळ्या घातल्या होत्या. या हत्या प्रकरणात सैन्याशी नाव जोडले गेल्याने पोलीस या प्रकरणात काही बोलण्यास तयार नाहीएत.

गोगामेडी यांच्या हत्येचे तार शेजारील राज्य हरियाणाच्या महेंद्रगढ जिल्ह्याशी जोडले गेले आहेत. गोगामेडी यांच्या हत्येतील एक शूटर नितीन फौजी हा महेंद्रगढच्या जौगडा जाट भागातील रहिवासी आहे. नितीश सध्या भारतीय लष्करात असून तो अलवर येथे तैनात आहे.

पोलिसांना आरोपींची ओळख पटविली आहे. एका आरोपीचे नाव रोहित राठोड आहे. तो नागौरच्या मकरानाचा रहिवासी आहे. तर नितीन फौजी हा २०१९ मध्ये सैन्यात भरती झाला होता. त्याने ९ नोव्हेंबरला दोन दिवसांची सुट्टी घेतली होती. परंतू, तो परत ड्युटीवर परतला नव्हता.

पोलीस नितीनच्या वडिलांकडे गेले असता त्यांनी देखील ९ नोव्हेंबरला नितीन ११ वाजता गाडी दुरुस्त करण्याचे सांगून गेला होता, त्यानंतर त्याच्याशी काही संपर्क झाला नाही, असे सांगितले. नितीनचा भाऊ विकासदेखील जाट रेजिमेंटमध्ये तैनात आहे. त्याचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. राजस्थानमध्ये त्याचे सासर आहे.

१० नोव्हेंबरला नितीन फौजीने महेंद्रगडच्या एका व्यक्तीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली आणि फौजीच्या गाडीचा पाठलाग सुरु केला होता. या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते तर नितीन फौजी पळाला होता.

कपडा व्यापारी नवीन शेखावत हे त्यांच्या आतेच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गोगमेडी यांच्याकडे आले होते. त्यावेळी त्यांनी सोबत रोहित आणि नितीन यांनाही आणले होते. यासाठी नवीनने पाच हजार रुपये दिवसाला असे ठरवून कार भाड्याने घेतली होती. या दोघांनी शेखावतलाही गोळ्या घातल्या होत्या.