२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 16:47 IST2025-07-21T16:41:58+5:302025-07-21T16:47:34+5:30

Rajasthan Teacher Sexual Abuse 23student: आधी विद्यार्थिीनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करायचा. नंतर त्यांनाच एकमेकांसोबत तसे करायला सांगायचा आणि त्याचे व्हिडीओ बनवायचा. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकाचे वासनांध कृत्य सुरू होतं.

शासकीय शाळेत शिकवण्याचे काम करण्याऐवजी ५९ वर्षीय शिक्षकाने जे कृत्य केले, ते समोर आल्यानंतर सगळे गाव नाही, तर जिल्हा हादरला. मागील दोन वर्षांपासून हा शिक्षक शाळेतील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांवर अत्याचार करत होता.

राजस्थानातील चित्तोडगढ जिल्ह्यातील बेगू पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एका सरकारी शाळेत हा प्रकार सुरू होता. शंभूलाल धाकड असे या वासनांध शिक्षकाचे नाव आहे. त्याने २३ विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केले.

शाळेत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी, १८ विद्यार्थ्यांनी स्वतःहून याबद्दल सगळी हकिकत सांगितली. या मुलांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यांच्या वडिलांचे जबाबही नोंदवण्यात आले. शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत केलेल्या कृत्याचे व्हिडीओ मिळाले आहेत.

या व्हिडीओमध्ये शिक्षक असलेला नराधम शंभूलाल धाकड हा विद्यार्थ्यांवर अत्याचार करत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही एकमेकांसोबत तसे करायला लावून त्याचे व्हिडीओ बनवले आहेत. विभागीय चौकशीत शिक्षक दोषी आढळला असून, त्याला बडतर्फही करण्यात आले आहे.

२३ पैकी एका विद्यार्थ्याने शाळेतीलच त्याच्या एका मित्राला शिक्षक अत्याचार करत असल्याचे सांगितले. तेव्हा त्या मुलाने माझ्यासोबतही ते तसंच करत असल्याचे सांगितले आणि प्रकरणाला वाच्या फुटली. त्या विद्यार्थ्याने आईवडिलांना हे सांगितले.

आईवडिलांनी तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पण, मुले जे सांगत आहेत, त्याला पुरावा काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला. त्यानंतर शाळेतीलच एका मुलाने शिक्षकाच्या मोबाईलमधील काही व्हिडीओ गुपचूप मिळवले आणि बिंग फुटले.

त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्याचे कार्यालय गाठले आणि नराधम शिक्षकाच्या अत्याचाराचा पाढा वाचला. व्हिडीओही दाखवले. मागील दोन वर्षांपासून हे सुरू असल्याचे तपासातून समोर आले.

पोलिसांनी जेव्हा शिक्षकाचा मोबाईल बघितला तेव्हा त्यात खूप सारे व्हिडीओ आढळून आले. या शिक्षकाविरोधात पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, आता प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गावातील नागरी शिक्षकाला कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.