Sachin Vaze : या पाच चुका करून फसले आणि सचिन वाझे एनआयएच्या जाळ्यात अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 07:12 PM2021-03-19T19:12:59+5:302021-03-19T19:20:41+5:30

Sachin Vaze Case :एनआयएकडून सचिन वाझेंच्या सुरू असलेल्या चौकशीत दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, सचिन वाझेंनी या प्रकरणात केलेल्या काही चुका त्यांना भोवल्या आहेत. त्यांचा घेतलेला हा आढावा.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात एनआयने पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक केल्याने राज्यातील पोलीस दलासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एनआयएकडून सुरू असलेल्या चौकशीत दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, सचिन वाझेंनी या प्रकरणात केलेल्या काही चुका त्यांना भोवल्या आहेत. त्यांचा घेतलेला हा आढावा.

पहिली चूक - Marathi News | पहिली चूक | Latest crime Photos at Lokmat.com

सचिन वाझे यांनी केलेली पहिली चूक म्हणजे त्यांनी या कारस्थानात ज्या गाडीचा वापर केला ती त्यांनी आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडून म्हणजेच मनसुख हिरेन यांच्याकडून घेतली होती. तेव्हा मनसुख हिरेन आणि त्यांच्यातील संबंध जगजाहीर होतील, याचा अंदाज सचिन वाझे यांना आला नव्हता. सुरुवातीच्या तपासामध्येही सचिन वाझे यांनी हिरेन यांच्याशी ओळख असल्याचे नाकारले होते.

दुसरी चूक - Marathi News | दुसरी चूक | Latest crime Photos at Lokmat.com

सचिन वाझे हा कट तडीस नेण्यासाठी स्वत:च स्कॉर्पिओ घेऊन वेशांतर करून अँटिलियाजवळ पोहोचले. एवढेच नाही तर 17 ते २५ फेब्रुवारीदरम्यान हिरेन यांच्याकडून घेतलेली स्कॉर्पिओ ठाण्यातील आपल्या घराजवळ उभी करून ठेवली. त्यावेळी अँटिलिया प्रकरणाची चौकशी आपल्या घरापर्यंत पोहोचेल याची कल्पनाही त्यांना नव्हती.

तिसरी चूक - Marathi News | तिसरी चूक | Latest crime Photos at Lokmat.com

सचिन वाझेंकडून झालेली तिसरी चूक म्हणले १०० नंबरवर कॉल गेल्यानंतर ते स्वत:च सर्वात आधी घटनास्थळावर पोहोचले. तसे सर्वांत आधी त्यांनी घटनास्थळी पोहोचणे अपेक्षितच होते. कारण त्यांनीच अँटिलियाजवळ स्कॉर्पिओ उभी केली होती. तसेच क्राइम ब्रँचकडील इनोव्हाचा वापर त्यांनी स्कॉर्पिओ घटनास्थळी ठेवल्यानंतर पसार होण्यासाठी केला होता.

चौथी चूक - Marathi News | चौथी चूक | Latest crime Photos at Lokmat.com

सचिन वाझेंनी केलेली चौथी चूक म्हणजे आपल्याच पथकातील म्हणजे मुंबई क्राइम ब्रँचमधील सीआययू युनिटमधील काही पोलिसांचा हा कट तडीस नेण्यासाठी वापर केला. तसेच त्यानंतर आपल्या घरातील आणि सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तपासाच्या नावावर आपल्याच टीमकडून ताब्यात घेतले.

पाचवी चूक - Marathi News | पाचवी चूक | Latest crime Photos at Lokmat.com

वाझे यांची पाचवी चूक म्हणजे जी काळी मर्सिडिज गाडी ते चालवायचे तिचाही त्यांनी या कटकारस्थानादरम्यान वापर केला. त्यानंतर त्या मर्सिडिजला आपल्याच ऑफिसबाहेर सर्व पुराव्यांनिशी उभे करून ठेवले. त्यावेळी एनआयएची टीम क्राइम ब्रँचच्या कार्यालयाची झाडाझडती घेण्यासाठी येणार नाही, असे त्यांना वाटले असावे, मात्र ती त्यांची मोठी चूक ठरली.