पोलीस अधिकारी थोडक्यात बचावला, नायलॉनने मांजाने गळा चिरला 

By पूनम अपराज | Updated: January 18, 2021 21:36 IST2021-01-18T21:30:33+5:302021-01-18T21:36:36+5:30

Police Officer : वरळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गवळी यांचा जीव शनिवारी थोडक्यात बचावला.

दुचाकीवरून न्यायालयात जात असताना नायलॉन मांजाने गवळी यांचा गळा चिरला. वेळेत उपचार मिळाल्याने राकेश गवळी बचावले.

राकेश गवळी शनिवारी दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. जे. जे. मार्ग जंक्शनवर अचानक पतंगीचा मांजा त्यांच्या गळ्याजवळ आला.

दुचाकीवर नियंत्रण मिळवताना कधी मांजाने गळा चिरला हे त्यांच्या उशिरा लक्षात आलं. पोलिसाच्या गळ्यातून रक्त येताना पाहून कर्तव्यावरील वाहतूक पोलीस मदतीला धावून आले.

त्यांनी गवळी यांना तात्काळ जे. जे. रुग्णालयात नेले. याबाबत समजताच तत्काळ पुढील उपचार मिळावेत यासाठी पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी त्यांना व्होकार्ट रुग्णालयात हलविले.

त्यांच्या गळ्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करून १० टाके टाकण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने गवळी यांचा जीव बचावला.