Pakistan: 'लैंगिक इच्छा' पूर्ण करण्यासाठी काय करतेस? पाकिस्तानी व्हिसा अधिकाऱ्याचे भारतीय महिलेसोबत अश्लिल वर्तन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 09:26 AM2023-01-13T09:26:53+5:302023-01-13T09:31:22+5:30

प्रोफेसर महिलेने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे, तसेच न्यायाची मागणी केली आहे.

दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयाच्या एका कर्मचाऱ्याने व्हिसा देण्याच्या बदल्यात भारतीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी महिलेच्या आरोपांची चौकशी करत असल्याचे म्हटले आहे.

टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानी अधिकाऱ्याने त्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. तसेच तिच्या सेक्युअलिटीवरून प्रश्न विचारले होते. या महिलेने पाकिस्तानी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानी व्हिसा हवा असेल तर भारतविरोधी पोस्ट करण्यासही सांगितल्याचे महिलेने म्हटले आहे.

पीडित महिला एक प्रोफेसर आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्याने तिचा हात धरला आणि तिने लग्न केले आहे का, असे विचारले. जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर मी चारवेळा लग्न करू शकतो. 'लैंगिक इच्छा' पूर्ण करण्यासाठी काय करतेस? असा सवालही विचारला होता असा आरोप या महिलेने केला आहे. ही घटना मार्च २०२२ मधील आहे.

या अधिकाऱ्याने सोशल मीडियावर भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरविरोधात वक्तव्ये करण्यास सांगितले होते. महिलेने पाकिस्तानी व्हिसासाठी अर्ज केला होता.

ती लाहोरमधील गुरुद्वारामध्ये एका कार्यक्रमात सहभागी होणार होती. याशिवाय इतर ठिकाणीही ती लेक्चर देणार होती. आता या महिलेने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे, तसेच न्यायाची मागणी केली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. आमच्या मिशनवर येणाऱ्या लोकांशी गैरवर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही. आम्ही सर्व व्हिसा आणि कॉन्सुलर अर्जदारांशी सौजन्य आणि न्याय्य वागणूक देण्यास अत्यंत महत्त्व देतो. आमच्या सर्व राजनैतिक कर्मचार्‍यांना व्यावसायिक वर्तनाबद्दल कडक सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.