"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:35 IST2025-11-08T14:13:57+5:302025-11-08T14:35:38+5:30

रील्स आणि लाईक्सच्या जगात हरवलेल्या एका पत्नीने आपल्या पतीला संपवलं.

रील्स आणि लाईक्सच्या जगात हरवलेल्या एका पत्नीने आपल्या पतीला संपवलं. इन्स्टाग्रामवर काही कमेंट्समुळे ती इतकी अस्वस्थ झाली की तिने ज्याला आपलं सर्वस्व मानलं त्यालाच मारण्याचा कट रचला.

मेरठमधील अग्वानपूर गावातील राहुल आणि त्याची पत्नी अंजली हे दोघं सोशल मीडियावरी एक आनंदी कपल होतं. अंजली तिचा पती राहुलसोबत रील्स बनवायची.

काही दिवसांनंतर रिल्सवर काही लोक कमेंट करू लागले, "वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण आहेत?" असे टोमणे मारू लागले. यामुळे अंजली नाराज झाली होती.

अंजली हळूहळू तिच्या पतीपासून दूर राहू लागली आणि एकटीच रील बनवू लागली. आपल्या पत्नीवर खूप प्रेम करणाऱ्या राहुलला याचा खूप त्रास होऊ लागला. तो हे सर्व पाहत होता पण त्याने कधीही आशा सोडली नाही.

अंजलीच्या आयुष्यात अजय नावाच्या तरुणाची एन्ट्री झाली. त्यांच्यात एक प्रेमसंबंध निर्माण झाले, राहुलला हे कळताच घरात भांडणं सुरू झाली. राहुलला संपवण्यासाठी तिने तिच्या प्रियकरासोबत एक भयानक प्लॅन केला.

१ नोव्हेंबरच्या रात्री राहुल कोणालातरी भेटायला जाणार असल्याचं सांगून घराबाहेर पडला आणि परतलाच नाही. दोन दिवसांनंतर, त्याचा मृतदेह गावाजवळील जंगलात सापडला. त्याच्या छातीला तीन गोळ्या लागल्या होत्या. अंजलीला तीन मुलं आहेत.

पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांनी अंजलीवर नजर ठेवली. कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य उघड झालं. अखेर पोलिसांनी अजय आणि अंजली दोघांनाही अटक केली.

चौकशीदरम्यान अजयने कबूल केले की, "अंजली आणि मी दीड वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. राहुलला कळताच तो भांडू लागला. अंजली मला त्याला आमच्या मार्गातून दूर करायला सांगायची."

"१ नोव्हेंबर रोजी मी राहुलला काही बहाण्याने फोन केला आणि त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर मी अंजलीला फोन करून सांगितलं, 'काम झालं आहे.'"

एसपी ग्रामीण अभिजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचे गूढ उकलण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली होती. कॉल डिटेल्सवरून संपूर्ण कट उघड झाला. दोघेही आता तुरुंगात आहेत.