एका अपघातात झाला होता शिक्षकाचा मृत्यू, १५ दिवसांनी समजलं पत्नीनेच केला होता हत्येचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 01:49 PM2021-10-12T13:49:26+5:302021-10-12T14:08:31+5:30

Haryana Crime News : गजेंद्रचा भाऊ भूपरामच्या तक्रारीवरून रस्त्यावरील दुर्घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या केसचा तपास डिटेक्टिव सेल इंचार्ज विश्व गौरव यांच्याकडे सोपवला.

हरयाणातील पलवलमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका शिक्षकाचं एका दुर्घटनेत निधन झालं होतं. अपघात सामान्य होता, पण लोकांनी रस्त्यावर होणाऱ्या अपघातांवरून आणि मृत्युंमुळे प्रदर्शन केलं. हायवे जाम केला. त्यानंतर पोलिसांनी अपघात करणाऱ्या कारचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. पोलिसांनी पंधरा दिवसात अपघात करणाऱ्या आरोपीला पकडलं.

इथपर्यंत हे प्रकरण अपघाताचं होतं. आरोपीची चौकशी केली गेली तर पोलिसही हैराण झाले. हा केवळ एक रस्त्यावरील अपघात नव्हता तर विचार आणि प्लॅन करून केलेली हत्या होती. या हत्येचा प्लॅन स्वत: मृत शिक्षकाच्या पत्नीनेच तिच्या प्रियकरासोबत मिळून केला होता. या प्रकरणात आणखी एका आरोपीचा शोध घेतला जात आहे.

नॅशनल हायवेवर २८ सप्टेंबरच्या सकाळी एक एसयूव्ही कार बाइकस्वाराला टक्कर मारून फरार झाली. बाईकवर औरंगाबादचा शिक्षक गजेंद्र सिंह होता. तो गुदराना गावातील सरकारी शाळेत शिक्षक होता.

गजेंद्रचा भाऊ भूपरामच्या तक्रारीवरून रस्त्यावरील दुर्घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या केसचा तपास डिटेक्टिव सेल इंचार्ज विश्व गौरव यांच्याकडे सोपवला.

डिटेक्टिव टीमने चौकशी दरम्यान एका टोल टॅक्स आणि ढाब्याचे सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. ज्यात अपघातावेळी कार होडलहून पलवलकडे येताना दिसली. पलवलला जाण्याऐवजी कार टर्न घेऊन होडल जाणाऱ्या रस्त्यावर उभी राहिली. यादरम्यान एका व्यक्तीने इशारा केला आणि आधीच तिथे उभ्या असलेल्या एसयूव्हीने वेगाने जात शिक्षक गजेंद्र सिंहच्या बाइकलला टक्कर मारून फरार झाली. शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांना एसयूव्ही गाडीवर संशय आला. पोलिसांनी ही कार दोन लोकांसह ताब्यात घेतली. चौकशी दरम्यान आरोपींची ओळख रोहताश आणि दीपक अशी पटली. रोहताशने पोलिसांना सांगितलं की, त्याचं शिक्षक गजेंद्रच्या घरी गेल्या चार-पाच वर्षापासून जाणं-येणं होतं. शिक्षक गजेंद्र सिंह आणि रोहताशचं सासर कौंडलमध्येच आहे. कौंडलमध्ये येत-जात असताना शिक्षक गजेंद्र सिंहची पत्नी पुष्पासोबत रोहताशची ओळख झाली. घरी जाताना रोहताशने पुष्पासोबत अनैतिक संबंध ठेवले.

पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत जेव्हा शिक्षक गजेंद्र सिंह याला समजलं तेव्हा तिला मारहाण करू लागला. रोजच्या मारहाणीला कंटाळून पुष्पाने आपल्या प्रियकर रोहताशसोबत आपल्या पतीला जीवे मारण्याचा प्लॅन केला.

योजनेनुसार,रोहतास आणि दीपकने शिक्षक गजेंद्र सिंहला शाळेत जाते वेळी जीवे मारलं. प्लॅन करण्याचा आणि हत्या करण्याची पूर्ण माहिती पुष्पाला होती. पोलिसांनी रोहताश, दीपक आणि पुष्पाला अटक केलीये. एसपी दीपक गहलावत यांनी सांगितलं की, फरार आरोपीला अटक करण्यासाठी आणि गाडी मिळवण्यासाठी तिघांना रिमांडमध्ये घेण्यात आलं आहे.