धक्कादायक! तब्बल १०० महिलांसोबत त्याने...; पैलवानाचा जबाब ऐकून पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 01:06 PM2022-12-06T13:06:49+5:302022-12-06T13:10:14+5:30

गुजरातच्या राजकोट पोलिसांनी एका कुस्ती पैलवानाला अटक केली आहे. राज्यस्तरावर सुवर्णपदक विजेत्या या कुस्तीपटूने आतापर्यंत १०० महिलांचा विनयभंग केल्याची कबुली दिली आहे. चौकशीत झालेल्या या खुलाशामुळे पोलीसही हैराण झालेत.

कुस्तीपटूच्या शरीरामागे वर्षानुवर्षे लपलेला राक्षस आहे, जो महिलांच्या इज्जतीशी खेळतो आणि कुस्तीपटू असल्याच्या भीतीने कुणी पोलिसांत तक्रारही करत नाहीत, हे जाणून पोलिसांना धक्का बसला. पण एका योगा शिक्षिकेने हिंमत दाखवून गुन्हा दाखल केला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

कौशल पिपलिया असं आरोपीचे नाव आहे. २०१६, २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये ७४ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले आहे. योगा शिक्षिकेचे लैंगिक शोषण केल्यानंतर तो १० दिवस फरार होता.

TOI वृत्तानुसार, राजकोट पोलिसांना अखेर त्याला अटक करण्यात यश आलं आहे. पीडितेने २३ नोव्हेंबर रोजी राजकोटमधील मालवीय नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या कुस्तीपटूने लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे.

फिर्यादी पीडितेच्या म्हणण्यानुसार, माझी दुचाकी ज्या ठिकाणी उभी होती तेथे आरोपी बसला होता. मी दुचाकी पार्क केल्यानंतर जवळच्या इमारतीच्या लिफ्टने वरच्या मजल्यावर जाऊ लागली, तेव्हा अचानक या आरोपीने लिफ्टसमोर येऊन दरवाजा अडवला.

यानंतर या आरोपीने त्याची पँट काढली आणि पीडितेकडे पाहून अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. पीडितेने त्याला ढकलून लिफ्टमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आरोपीने पीडितेच्या कानाखाली मारून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.

पीडितेने आरडाओरडा केल्यावर त्याने तेथून पळ काढला. यानंतर पीडितेने राजकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली. वेगवेगळ्या भागातील १५०० सीसीटीव्ही फुटेज तपासले.

या फुटेजची तपासणी करताना एक संशयित व्यक्ती मास्क घातलेला दिसला. हा संशयित भक्तीनगरजवळील देवपारा सोसायटीजवळ अनेकदा दिसला होता. पोलिसांनी आजूबाजूच्या सोसायटीत शोध सुरू केला असता विवेकानंद सोसायटीत राहणारा आरोपी पकडला गेला.

मालवीयनगरचे पोलीस निरीक्षक आयएन सावलिया म्हणाले की, पिपलियाने सुमारे १०० महिलांसोबत अश्लील कृत्य केल्याची कबुली दिली आहे. या कृत्याने त्याला आनंद मिळायचा. आजवर लाजेपोटी त्याच्याविरुद्ध कोणीही तक्रार दाखल केली नव्हती.

पिपलिया हा रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या मागच्या बाजूस हात लावायचा. त्याला यापूर्वी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. शैक्षणिक संस्था असणाऱ्या परिसरात तो मुलींची छेड काढायचा. नेहमी मास्क घालून फिरायचा जेणेकरून त्याला कुणी ओळखू नये असं पोलीस म्हणाले.