मुलांना दुसऱ्या खोलीत बंद केलं अन् डॉक्टर पत्नीला जीवे मारलं; ह्दयद्रावक घटनेनं परिसर हळहळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 15:25 IST2021-10-18T15:21:44+5:302021-10-18T15:25:08+5:30

उत्तर प्रदेशातील आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या आरोग्य अधिकारी डॉ. आस्था अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. आस्था अग्रवाल हत्येच्यावेळी पतीसोबत घटनास्थळी आणखी ३ जण उपस्थित होते. याबाबत पोलिसांना पुरावे सापडले आहेत.
पुराव्याच्या आधारे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. अरुणसहित अन्य आरोपींचे लोकेशन मिळाले आहे. रमेश विहारमध्ये राहणाऱ्या आरोग्य अधिकारी डॉ. आस्था अग्रवाल यांचा मृतदेह १३ ऑक्टोबरला त्यांच्या घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.
मात्र पोलिसांच्या चौकशीत आढळलं की, मंगळवारी रात्री पतीसोबत झालेल्या भांडणातून पतीने गळा दाबून आस्थाची हत्या केली. त्यानंतर घटनेला आत्महत्या वाटावी यासाठी मृतदेह पंख्याला लटकवला. आस्थाच्या बहिणीने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पोलीस आरोपी पती अरुणचा शोध घेत आहेत.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तपासात अरुणने ५ दिवसांपूर्वीच पत्नी आस्था अग्रवालच्या हत्येचं षडयंत्र रचलं होतं. यासाठी त्याने त्याच्या घरातील अनेक वस्तू बाहेर विकल्या होत्या इतकचं नाही तर हत्येसाठी साथ द्यायला अन्य ३ जणांना तयार केले होते.
हत्येवेळी ३ जण घरात उपस्थित होते. आता हे तिघं कोण होते याचा पुरावा पोलिसांना मिळाला आहे. परंतु अटक होण्याआधी आणखी काही पुरावे पोलीस शोधत आहेत. भांडणावेळी लहान मुलांना दुसऱ्या खोलीत बंद केले होते त्यानंतर आस्थाचा गळा आवळला. आरोपींनी आस्थाने आत्महत्या केली वाटावी यासाठी तिचा मृतदेह पंख्याला लटकावला.
आस्थाच्या अटकेनंतर मुलांना घेऊन अरुण कासिमपूर प्लांटला पळून गेला. परंतु मुलांना भावाच्या घरी सोडत तो दिल्लीकडे आला. काही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना अरुण आणि त्याच्या ३ साथीदारांचं लोकेशन ट्रेस करण्यात यश आलं आहे.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी चार वेगवेगळ्या टीम बनवल्या. त्यात शिमला, चंदीगड, दिल्ली याठिकाणी पाठवल्या. पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी सज्ज आहेत. घटनास्थळाहून महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. लवकरच त्याचा खुलासा होऊ शकतो
आतापर्यंत काही साक्षीदार आणि मुलांनी दिलेल्या जबाबातून अनेक माहिती मिळाली. परंतु मुलांनी घरी घटनेच्या वेळी ३ अन्य लोकं असल्याचं लपवलं होतं. त्यामुळे मुलांना इतकं भय घातलं होतं की त्यांनी काहीच न सांगता मौन बाळगावं असं पोलिसांना वाटत आहे.
आरोपींच्या अटकेनंतर पोलीस पुन्हा एकदा मुलांचा जबाब नोंदवून घेणार आहेत. लहान मुलांनी सत्य काय घडलं होतं ते सांगावं यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. मुलांच्या जबाबानंतर सगळं काही स्पष्ट समोर येऊ शकतं असं पोलिसांना वाटत आहे.