डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:40 IST2025-05-21T13:29:20+5:302025-05-21T13:40:43+5:30

आधी आयुर्वेदात डॉक्टरकी मिळवली आणि त्यानंतर ११ वर्ष मेडिकल प्रॅक्टिस केली. त्यानंतर बोगस गॅस एजेन्सी सुरू करत किडनी ट्रान्सप्लांटच्या रॅकेटमध्ये सहभागी झाला. एका पाठोपाठा एक ५० हून अधिक क्रूर हत्या केल्या आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मगरींचा वापर केला.
ही एखाद्या सिनेमाची अथवा वेबसिरीजची कहाणी नाही, तर गुन्ह्याचं असला चेहरा आहे जे ऐकून अंगावर काटा येईल. ५० लोकांच्या हत्येनंतर तो गणित विसरला, कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी पुजारीच्या वेषात एका आश्रमात जाऊन राहिला.
ही कहाणी आहे डॉक्टर देवेंद्र शर्माची, ज्याने डॉक्टरी व्यवसायाला काळिमा फासला. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी राजस्थानच्या दौसामधील एका आश्रमातून देवेंद्र शर्माला अटक केली. २०२३ मध्ये पॅरोल मिळाल्यापासून तो फरार होता. त्याने ५० हून अधिक हत्या केल्या आहेत आणि पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह उत्तर प्रदेशातील कासगंज इथल्या मगरींनी भरलेल्या कालव्यात फेकले.
देवेंद्र शर्माने बिहारच्या एका कॉलेजमधून बीएएमएसचं शिक्षण घेतले. पदवी घेतल्यानंतर तो राजस्थानला आला. बांदीकुई भागात त्याने जनता क्लिनीक उघडून मेडिकल प्रॅक्टिस केली. जवळपास ११ वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर त्याने डॉक्टरी व्यवसाय सोडला आणि गॅस एजन्सी उघडायची म्हणून अलीगडला आला.
या नव्या व्यवसायात त्याची फसवणूक झाली. मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी त्याने गुन्हेगारीचा मार्ग अवलंबला. बोगस गॅस एजन्सी बनवत ३ वेगवेगळ्या तेल कंपन्यांकडून आलेले ट्रक लुटायला लागला. हे करत असतानाच १९९८ ते २००४ या काळात त्याने अवैध किडनी ट्रान्सप्लांट रॅकेट चालवले. त्याने डॉक्टर आणि रॅकेटच्या मदतीने हरियाणा, राजस्थानात १२५ हून अधिक अवैध किडनी ट्रान्सप्लांट केले. त्याच्या संपर्कात अनेक डॉक्टर, गुन्हेगारी लोक आले.
किडनी ट्रान्सप्लांटच्या बदल्यात ५ ते ७ लाख रुपये मिळत होते. इतके करूनही त्याचे मन भरले नाही. त्यानंतर त्याने टॅक्सी चालकांना टार्गेट करणे सुरू केले. दिल्लीतून टॅक्सी भाड्याने घ्यायचा आणि रस्त्यात संधी मिळताच चालकाची हत्या करायचा. हत्येनंतर त्याचा मृतदेह यूपीच्या कासगंजमध्ये वाहणाऱ्या कालव्यात फेकून द्यायचा, जेणेकरून कोणालाही कोणताही पुरावा सापडू नये.
५० हत्येनंतर आकडे विसरला - हत्या आणि मृतदेह फेकल्यानंतर देवेंद्र त्या टॅक्सी घेऊन २०-२५ हजारात भंगारात विकायचा. देवेंद्रने त्याची टोळी बनवली होती. कालांतराने हे प्रकरण उघडकीस आले आणि देवेंद्रला २१ टॅक्सी चालकांच्या हत्येच्या आरोपात अटक केले. त्यानंतर तपासात त्याने ५० हून अधिक लोकांना मारल्याची कबुली दिली. ५० लोकांना मारल्यानंतर तो आकडे विसरला असेही त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांना हत्या केलेले मृतदेह सापडले नसल्याने देवेंद्रला केवळ ७ जणांच्या हत्येसाठी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. जानेवारी २०२० मध्ये देवेंद्रच्या जेलमधील चांगल्या वर्तवणुकीमुळे त्याला जयपूर सेंट्रल जेलमधून पॅरोलवर सोडले होते परंतु पॅरोल कालावधी संपल्यानंतरही तो जेलला परतला नाही.
दुसरं लग्न अन् प्रॉपर्टी धंदा - काही महिन्यांनी पोलिसांना देवेंद्रने दुसरं लग्न केले असून तो पत्नीसह बापरोला भागात राहत असल्याची माहिती मिळाली. त्याने प्रॉपर्टी डिलरशिप व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून देवेंद्रला अटक केली आणि पुन्हा तिहार जेलमध्ये त्याची रवानगी केली. पुन्हा देवेंद्रला २ महिन्याची पॅरोल दिली. जून २०२३ साली तो जेलमधून बाहेर पडला आणि पुन्हा परतलाच नाही.
पोलिसांनी जयपूर, अलीगड, दिल्ली इथं त्याचा शोध घेतला परंतु काहीच सुगावा लागला नाही. जवळपास ६ महिन्यांनी देवेंद्रच्या मोबाईलचे लोकेशन राजस्थानच्या दौसा येथे सापडले. त्याचे लोकेशन एका आश्रमात होते. त्यानंतर साध्या वेशात पोलिसांनी आश्रमात प्रवेश केला. त्याच्या हालचालीवर नजर ठेवली. तेव्हा तो पुजारीच्या वेशात लपून राहिला होता. त्याचे ठोस पुरावे सापडल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली.