लग्न थांबलं... नाराज नवरदेवानं रागाच्या भरात नवरीच्या लहान बहिणीचं केलं अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 07:49 PM2020-12-11T19:49:03+5:302020-12-11T20:09:34+5:30

पोलीस प्रशासन बाल विवाह रोखण्यासाठी गेले असता नवरदेवाने रागाच्या भरात नवरीच्या अल्पवयीन बहिणीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी अल्पवयीन तरुणीचे लग्न थांबवले असून अपहरण झालेल्या नवरीच्या बहिणीलाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात नवरदेवाच्या नात्यातील एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, नवरदेव फरार झाला आहे.

मुरैना जिल्ह्याजवळील पोरसा ठाणे क्षेत्रातील एका गावात दलित अल्पवयीन मुलीचे लग्न होणार असल्याची सूचना मिळाली होती. यानंतर पोलीस प्रशासन आणि महिला बाल विकास विभागाने रेस्क्यू सुरू केले.

कुटुंबीयांची समजूत काढून मुलीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मात्र या गोंधळात नवरदेवाने अल्पवयीन मुलीच्या भांगेत कुंकू भरला होता.

पोलीस व प्रशासनाने डॉक्टरांकडून परीक्षण केल्यानंतर मुलीला मुरैनामधील वन-स्टॉप सेंटरमध्ये दाखल केले आहे.

लग्न थांबल्यामुळे रागाच्या भरात नवरदेवाने आपल्या नात्यातील एक महिलेला मुलीच्या घरी पाठवले व अल्पवयीन मुलीच्या छोट्या बहिणीला लग्न करण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने घेऊन गेला.

याची माहिती मिळताच पोलीस व प्रशासनाने तपास सुरू केला व अपहरण केलेल्या मुलीची सुटका केली. या घटनेत नवरदेवाला मदत करणाऱ्या महिलेलाही पकडण्यात आले आहे.

पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन अपहरण आणि बाल विवाह अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करीत फरार झालेल्या नवरदेवाचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, अशा प्रकारचे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून समुपदेशनाबरोबरच तातडीने कारवाई केली जात आहे.