'माझ्या आईला फाशी देऊ नका, मी एकटा पडेल', ७ हत्या करणाऱ्या शबनमच्या मुलाची राष्ट्रपतींकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 10:47 AM2021-02-18T10:47:03+5:302021-02-18T11:01:39+5:30

Amroha Murder Case : प्रेमासाठी शिक्षिका असलेल्या शबनमने घरातीलच ७ लोकांची क्रूरपणे हत्या केली होती. कारण हे तिच्या घरातील लोक तिच्या प्रेमाच्या विरोधात होते. ती सलीम नावाच्या एका आठवी पास तरूणावर प्रेम करत होती.

यूपीतील अमरोहा येथील बहुचर्चीत हत्याकांडातील (Amroha Murder Case) दोषी शबनमच्या(Shabnam) डेथ वॉरन्टवर कोणत्याही क्षणी हस्ताक्षर होऊ शकतात. लवकरच शबनमला मथुरा येथील तुरूंगात फासावर लटकवलं जाऊ शकतं. मात्र, अशातच शबनमचा मुलगा ताजने देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या आईची फाशीची शिक्षा माफ करण्याची मागणी केली आहे.

शबनमचा मुलगा ताज याने राष्ट्रपतींकडे आपल्या आईची शिक्षा माफ करण्याची मागणीच केली नाही तर त्याने आईला तुरूंगात भेटायला जाण्याच्या आठवणीही सांगितल्या. तो आईला भेटायला रामपूर तुरूंगात जात होता. ताज म्हणाला की, त्याची आई त्याच्यावर खूप प्रेम करते. ती त्याला मीठी मारते आणि कुशीत लपवते. त्याला पैसेही देते.

ताज म्हणाला की, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी त्याच्या आईची शिक्षा माफ करावी. जेणेकरून तो अनाथ होणार नाही. शबनम जेव्ह आपला मुलगा ताजला भेटली होती तेव्हा ती त्याला म्हणाली होती की, मन लावून अभ्यास कर. मन लावून अभ्यास करशील तेव्हाच पुढे जाशील.

बुलंदशहरच्या सुशीला विहार कॉलनीमध्ये शबनमचा एकुलता एक मुलगा ताज कस्टोडीअन उस्मान सैफीच्या परिवारासोबत राहतो. शबनमला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ताजचा जन्म तुरूंगात झाला होता. पण जेव्हा ताज ६ वर्षांचा झाला तेव्हा त्याला तुरूंगातून बाहेर पाठवण्यात आलं. नंतर अमरोहा जिल्हा प्रशासनाने त्याची कस्टडी उस्मान सैफी यांना दिली होती.

उस्मान सांगतात की, ताज बुंदलशहरच्या चांगल्या शाळेत शिकतो. त्याच्यासाठी तिथे सर्वच व्यवस्था आहे. ते असंही म्हणाले की, ताजची आई शबनमकडे भरपूर प्रॉपर्टी आहे. त्यांनी तिला सांगितले की तिने तिची प्रॉपर्टी शाळा, कॉलेज, हॉस्पिटलला दान करावी.

ताजला आईचं प्रेम देणाऱ्या उस्मान सैफी यांच्या पत्नी वंदना सिंह म्हणाल्या की, सुरूवातीला ताजला कस्टडीत घेतल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण नंतर ताज आमच्यासोबत अॅडजस्ट करणं शिकला. वंदना यांनी सांगितले की, त्या स्वत: एक शिक्षिका आहेत आणि त्यांना हे माहीत आहे की या वयात मुलांना कोणत्या गोष्टींची गरज असते किंवा त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्या ताजची व्यवस्थित काळजी घेऊ शकतात. त्यांना गर्व आहे की ताजने तुरूंगात जन्म घेतला, पण तरी सुद्धा तो एका सामान्य मुलाप्रमाणे वंदना आणि उस्मान यांच्या अपेक्षांवर खरा ठरला.

१५ एप्रिल २००८ ला अमरोहातील बामन खेडी गावात राहणाऱ्या शबनमने तिचा प्रियकर सलीमसोबत मिळून आपले वडील, आई, दोन भाऊ, मावशीची मुलगी आणि भाज्याची कुऱ्हाडी हत्या केली होती. हे लोक तिच्या प्रेमात अडसर ठरत होते.

कोर्टाने तिला फाशीची शिक्षा सुनावली होती. राष्ट्रपतींनीही तिचा माफी अर्ज फेटाळला होता. आता शबनमला फाशी देण्याची तयारी सुरू झाली आहे. मथुरा येथील तुरूंगात शबनमला फाशी दिली जाईल.

ही स्वतंत्र भारतात एका महिलेला दिली जाणारी पहिली फाशी असेल. तुरूंग प्रशासनाने फाशी देण्यासाठी दोराची ऑर्डर दिली आहे. तसेच जल्लाद पवन याने फाशी घराची पाहणीही केली आहे. मात्र, अजून तुरूंग प्रशासनाला शबनमच्या डेथ वॉरन्टची प्रतिक्षा आहे.