दिल्लीत तरुणीला फरफटत नेल्याच्या प्रकरणात नवा खुलासा, मृत तरुणीच्या मैत्रिणीचा गांजाचा धंदा, झाली होती अटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 06:32 PM2023-01-07T18:32:54+5:302023-01-07T18:41:03+5:30

दिल्लीच्या कंझावाला प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेल्या निधी हिच्याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. यूपीच्या आग्रा येथे जीआरपी पोलिसांनी २ वर्षांपू्र्वी म्हणजेच २०२० साली निधी हिला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक केली गेली होती.

तिच्यासोबत इतर दोन मुलांनाही अटक झाली होती. निधी महिनाभर तुरुंगात देखील होती. त्यानंतर जामीनावर तिची सुटका झाली होती. जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या अप्पर जिल्हा न्यायाधिशांनी जामीन दिला होता. पोलीस रेकॉर्डनुसार, निधी ड्रग्ज तस्करीसाठी दिल्लीहून तेलंगणातील सिकंदराबाद येथे गेली होती. तिथं आपले दोन मित्र समीर आणि रवी यांच्यासोबत रेल्वेनं पुन्हा आग्रा येथे आली. घटना ६ डिसेंबर २०२० सालची आहे.

निधी आग्राच्या केंट स्टेशनवर समीर आणि रवीसोबत प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर रेल्वेतून खाली उतरली होती. सकाळी १०.५५ वाजता आरपीएफ आणि स्टेशनच्या जीआरपी टीम स्टेशनवर प्रवाशांची झडती घेत होती. याचवेळी पोलिसांच्या टीमची नजर निधी, रवी आणि समीरवर पडली असता तिघंही तिथून पळ काढू लागले. पोलिसांना संशय आला आणि तिघांचाही पाठलाग करुन अटक करण्यात आली. पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडून १०-१० किलो गांजा जप्त करण्यात आला होता.

पोलिसांनी त्यावेळी केलेल्या चौकशीत निधीनं सर्व माहिती दिली होती. तेलंगणाच्या सिकंदराबाद येथून गांज्याची एक खेप घेऊन ते आग्राला आले होते. आग्राहून रस्ते मार्गानं ते दिल्लीला जाणार होते. दिल्लीत राहणाऱ्या दिपकच्या म्हणण्यानुसार गांजा घेऊन आले होते असंही निधीनं सांगितलं. तर रवी आणि समीर यांनी स्वत: ते गांजा विकत असल्याचं कबुल केलं होतं. पोलिसांनी तिघांनाही कोर्टासमोर हजर केलं असता तिघांनाही तुरुंगात धाडण्यात आलं होतं.

निधी हिला १५ डिसेंबर २०२० रोजी जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर ८ जानेवारी २०२१ रोजी ती तुरुंगातून बाहेर आली होती. त्यानंतर निधी वैयक्तिकरित्या कोर्टासमोर कधी हजर झालेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार निधी दिल्लीच्या सुल्तानपुरी सी, ७/११ झोपडी नंबर १ येथे राहणारी आहे.

अंजली नावाच्या तरुणीला १ जानेवारीच्या पहाटे कारखाली १३ किलोमीटर फरफटत नेल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणामध्ये आज तिची मैत्रीण निधी हिच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ज्या रात्री अंजलीचा अपघात झाला त्या रात्री अंजली ज्या मैत्रिणीसोबत होती, तिचं नाव निधी आहे. निधीचं आणि अंजलीचं कडाक्याचं भांडणही झालं होतं. भांडणामुळेच त्यांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात आलं. बाहेर काढल्यानंतरही त्यांची भांडणं सुरुच होती.

या प्रकरणामध्ये आता ७ जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. कारमालक आणि अन्य एकाने काल समर्पण केलं. निधीने अंजली नशेत असल्याचं सांगितलं होतं. मात्र अंजलीच्या घरच्यांनी निधीबद्दलच शंका उपस्थित करुन तिचं नाव कधीच ऐकलं नसल्याचं म्हटलं आहे.

कंजावाला केसमध्ये प्रत्यक्षदर्शी असलेल्या निधीने दिलेल्या माहितीवरुन दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी संपूर्ण घटनेचा रुट जाणून घेतला होता. दिल्ली पोलिसांची एक टीम निधीला ओयो हॉटेलमध्येही घेऊन गेली होती जिधं ३१ डिसेंबर रोजी अंजलीसोबत ती पार्टीसाठी गेली होती.

हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर निधी आणि अंजली स्कूटीनं नेमक्या कोणत्या रस्त्यानं कुठवर गेले होते हे पोलिसांनी जाणून घेतलं. नेमकं कोणत्या जागेवर दोघी थांबल्या, नंतर कुठून अंजलीनं स्कूटी चालवण्यास सुरुवात केली अशी सर्व माहिती पोलिसांनी निधीकडून जाणून घेतली आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

टॅग्स :अपघातAccident