शेअर बाजारात तेजी असतानाही २० लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, कारण वाचून तुम्हीही व्हाल सावध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:17 IST2025-07-11T15:45:57+5:302025-07-11T16:17:17+5:30
Indian Stock Market : या वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांत शेअर बाजारातून जवळपास २० लाख सक्रिय गुंतवणूकदार बाहेर पडले आहेत. यापाठीमागचे कारणही समोर आलं आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला शेअर बाजारात मोठी घसरण झाली असली तरी, गेल्या चार महिन्यांपासून बाजारात सलग तेजी दिसून येत आहे. निफ्टी ५० देखील सकारात्मक राहिला आहे. असे असतानाही, एक आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे.
देशातील चार प्रमुख ब्रोकरेज कंपन्या ग्रोव (Groww), झेरोधा (Zerodha), एंजेल वन (Angel One) आणि अपस्टॉक्स (Upstox) यांनी या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सुमारे २० लाख सक्रिय गुंतवणूकदार गमावले आहेत. केवळ जून २०२५ मध्येच ६ लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी या चार ब्रोकरेज कंपन्यांपासून स्वतःला दूर केले आहे.
या वर्षात आतापर्यंत ग्रोने ६ लाख सक्रिय गुंतवणूकदार गमावले आहेत. झेरोधाने ५.५ लाख, एंजल वनने ४.५ लाख आणि अपस्टॉक्सचे ३ लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी साथ सोडली आहे.
अनेक नवीन पिढीतील गुंतवणूकदार, विशेषतः किरकोळ व्यापारी, जलद नफा मिळविण्याच्या उद्देशाने बाजारात आले होते. जेव्हा त्यांना अपेक्षित परतावा मिळाला नाही किंवा तोटा सहन करावा लागला, तेव्हा असे गुंतवणूकदार बाहेर पडल्याचे दिसते.
तसेच, बाजारातील अस्थिरता, काही शेअर्सच्या वाढलेल्या किमती आणि सतत बदलणारी सरकारी धोरणे यामुळे गुंतवणूकदारांचे विचार बदलले आहेत.
बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही एक 'नैसर्गिक कपात' आहे. याचा अर्थ, ज्यांना बाजाराची पूर्ण माहिती नव्हती किंवा ज्यांचा दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा हेतू नव्हता, ते हळूहळू बाहेर पडत आहेत. पण, दीर्घकालीन गुंतवणूक आणि बाजाराची समज असलेल्या लोकांसाठी ते अजूनही एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे.