कोण आहेत IndiGo चे मालक? दोन मित्रांनी कर्ज घेऊन सुरू केलेली कंपनी, आज मोठ्या अडचणीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:12 IST2025-12-08T18:02:48+5:302025-12-08T18:12:46+5:30

सुरुवातीला उधारीवर घेतलेले विमान; 2006 साली पहिले उड्डाण..!

IndiGo Airlines : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो (IndiGo) गेल्या काही दिवसांपासून संकटात सापडली आहे. मनुष्यबळाअभावी कंपनीने शेकडो फ्लाइट्स अचानक रद्द केल्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या संकटाच्या पार्श्वभूमीवर ही एवढी मोठी एअरलाइन कंपनी नेमकी कोणाची आहे? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

इंडिगोची सुरुवात 2006 साली झाली. ही कंपनी राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल या दोन मित्रांनी सुरू केली. राहुल भाटिया University of Waterloo चे विद्यार्थी आहेत, तर राकेश गंगवाल यांनी IIT कानपूरमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. मोठ-मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर 2004 मध्ये दोघांनी मिळून इंटरग्लोब एव्हिएशन (IndiGo ची पेरेंट कंपनी) स्थापन केली.

त्या काळात देशातील विमान वाहतूक क्षेत्र अडचणीत होते. इंडिगोकडे सुरुवातीला स्वतःचे विमान नव्हते, त्यामुळे दोन वर्षे उड्डाणच सुरू करता आले नाही. याच ठिकाणी राकेश गंगवाल यांची ओळख कामी आली. त्यांनी एअरबसकडून 100 विमान 'उधारीवर' घेतले आणि 4 ऑगस्ट 2006 रोजी कंपनीने पहिले उड्डाण घेतले.

इंटरग्लोब एव्हिएशनचे 2015 मध्ये शेअर बाजारात लिस्टिंग झाले. सध्या राहुल भाटिया कंपनीचे नेतृत्व करतात. चढ-उतारांना तोंड देत इंडिगो आज देशातील सर्वात मोठी एअरलाइन बनली आहे. कंपनीत सध्या राकेश गंगवाल यांची हिस्सेदारी 4.53% आहे, तर राहुल भाटिया यांची हिस्सेदारी फक्त 0.01% आहे.

इंडिगो संकटात का आली? इंडिगोने त्यांच्या समस्यांसाठी दोन प्रमुख कारणे दिली आहेत. पहिले- तांत्रिक अडचणी आणि दुसरे- नवीन क्रू रोस्टरिंग नियम. 1 नोव्हेंबरपासून लागू झालेले FDTL (Flight Duty Time Limit) नियम पायलट व क्रू मेंबर्सना जास्त वेळ विश्रांती देण्याची सक्ती करतात. क्रूची कमतरता आणि वाढलेला आरामाचा कालावधी यामुळे मोठ्या प्रमाणावर उड्डाण रद्द होत आहेत.

यामुळे गेल्या काही दिवसांत हजारो फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत, तर कंपनीने प्रवाशांना 610 कोटी रुपयांचा रिफंड दिला आहे. या संकटामुळे इंडिगोचे शेअर्सही कोसळले आहेत. सोमवारी InterGlobe Aviation चे शेअर्स 9% ने घसरले, ज्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप कमी होऊन 1.89 लाख कोटी रुपये झाले.