पुराच्या पाण्यात कार खराब झाली किंवा वाहून गेली तर क्लेम मिळतो का? जाणून घ्या माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 07:22 PM2023-07-09T19:22:55+5:302023-07-09T19:27:03+5:30

Vehicles Damaged In Flood: पुराच्या पण्यात गाडी वाहून गेल्याचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

Vehicles Damaged In Flood : देशभरात मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. उत्तर भारतात तर पावसाने कहर केला आहे. अनेक राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सोशल मीडियावर पावसाच्या पाण्यात गाड्या वाहून गेल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेक भागात कार आणि बाईक पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत पुरात गाडी बुडाली किंवा वाहून गेली, तर त्यावर क्लेम मिळता, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल.

जर तुमची कार किंवा बाईक पुराच्या पाण्याखाली आली, अथवा वाहून गेली, तर सर्वप्रथम कार किंवा बाइकच्या दुरुस्तीच्या खर्चाचा दावा करण्यासाठी तुमच्या विमा कंपनीशी संपर्क साधावा लागेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक कार विमा तुम्हाला या संदर्भात मदत करू शकत नाही.

म्हणूनच, कार विमा पॉलिसी घेण्यापूर्वी त्यातील सर्व छोट्या-छोट्या बाबी आणि फायदे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. विमा कंपन्या अशा पॉलिसी ऑफर करतात, ज्यात वाहनाच्या मालकांना नैसर्गिक आपत्तींमुळे त्यांच्या कारचे झालेले नुकसान भरुन देण्यास मदत करतात.

अशा पॉलिसींना सर्वसमावेशक कार विमा पॉलिसी(Comprehensive Car Insurance Policy) म्हणतात. यात तुम्हाला पूर, भूकंप, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळते.

या पॉलिसीमध्ये कार किंवा कोणत्याही प्रकारच्या वाहनांचे अपघाती नुकसान, आग किंवा स्फोट, चोरी आणि थर्ट पार्टी क्लेमही मिळतो. या पॉलिसीत पुराच्या पाण्यामुळे इंजिन किंवा गिअरबॉक्ससारख्या वस्तुंचा सर्व खर्च देते.

सर्वसमावेशक विमा पॉलिसी कारच्या इंजिनला झालेले नुकसान कव्हर करत नाही. त्यामुळे तुम्हाला इंजिन संरक्षण कव्हर घ्यावे लागेल. या अॅड-ऑनसह तुम्ही तुमच्या कार किंवा बाईकचे खराब झालेले इंजिन दुरुस्त करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी क्लेम करू शकता.

जर पूराच्या पाण्यामुळे कार इतकी खराब झाली की, त्याची दुरुस्ती होऊ शकत नाही, अशा परिस्थितीत रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर खूप कामी येते. हे कव्हर तुमच्याकडे असेल, तर तुम्ही गाडीचे खरेदी मूल्य क्लेम करू शकता.

यात रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्सचा खर्च सामील आहे. यात तुमच्या पॉलिसीतील अटी फार महत्वाच्या आहेत. त्यामुळेच तुम्ही तुमच्या वाहनाचा विमा करण्यापूर्वी सर्व गोष्टी तपासून घ्याव्यात.