UPI Payment : विना इंटरनेटही होणार युपीआय पेमेंट, केवळ लक्षात ठेवा 'हे' चार डिजिट; पाहा सोपी पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 10:15 AM2022-11-21T10:15:12+5:302022-11-21T10:23:22+5:30

UPI व्यवहार करताना इंटरनेटचा स्पीड स्लो झालाय किंवा इंटरनेटच चालत नसल्याची समस्या येत आहे? पाहा विना इंटरनेट कशी वापरता येईल ही सुविधा.

UPI व्यवहार करताना इंटरनेटचा स्पीड स्लो झालाय किंवा इंटरनेटच चालत नसल्याची समस्या येत आहे? तुम्हाला माहितीये इंटरनेटशिवायही UPI व्यवहार करू शकता. सध्याच्या युगात, रोख व्यवहारांऐवजी, लोक ऑनलाइन किंवा UPI पेमेंटचा अधिक वापर करतात. परंतु, नेटवर्क स्लो असल्यास किंवा नेट नसल्यास हे पेमेंट करणे शक्य होत नाही.

अशा स्थितीत तुम्ही इंटरनेटशिवाय UPI व्यवहार करून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला USSD कोड वापरावा लागेल. ते वापरण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर UPI सेवा आधीपासूनच सक्रिय असणे आवश्यक आहे.

म्हणजेच, जर तुम्ही तुमचे खाते यापूर्वी Google Pay, Phone-Pe किंवा Paytm तसंच BHIM सारख्या UPI अॅप्सशी लिंक केले असेल तरच तुम्ही ते वापरू शकता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने *99# सेवा सुरू केली होती. जाणून घेऊया याचा वापर करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया.

यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड स्मार्टफोनच्या डायल पॅडवर जावे लागेल. त्यानंतर *99# डायल करा. त्यानंतर तुमच्या बँक फॅसिलिटीबाबत एक मेनू पॉप-अप होईल. यामध्ये सेंड मनी, रिक्वेस्ट मनी, चेक बॅलन्स, यूपीआय पिन असे पर्याय उपलब्ध असतील.

त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सेंड मनी या पर्यायावर क्लिक करा. यासाठी तुम्ही 1 टाइप करून पाठवा. त्यानंतर तुम्हाला ज्या पर्यायावर पैसे पाठवायचे आहेत तो पर्याय निवडावा लागेल. यामध्ये मोबाईल नंबर, UPI आयडी, सेव्ह केलेले लाभार्थी आणि इतर पर्याय उपलब्ध असतील.

नंतर निवडलेल्या पर्यायाचा नंबर टाइप करा आणि पाठवा. यानंतर तुम्हाला लाभार्थीचा तपशील द्यावा लागेल. तुम्ही पेमेंट रिमार्क देखील देऊ शकता. व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचा UPI पिन टाकावा लागेल.

UPI पिन टाकताच व्यवहार पूर्ण होईल आणि पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. म्हणजेच तुमचा ऑफलाइन UPI ​​व्यवहार पूर्ण होईल. तुम्ही ही UPI सेवा ऑफलाइन डिसेबलदेखील करू शकता. यासाठीही तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवरून *99# डायल करावे लागेल.