Top Billionairs : गौतम अदानींनी अंबानींना टाकलं मागे; बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 05:56 PM2022-02-04T17:56:26+5:302022-02-04T18:11:49+5:30

Forbes Real Time Billionaires List: जगभरातील शेअर बाजारात सतत्यानं होत असलेल्या घसरणीमुळे प्रमुख अब्जाधीशांच्या (Billionaires) संपत्तीवर मोठा परिणाम झाला आहे.

Forbes Real Time Billionaires List: जगभरातील शेअर बाजारात सतत्यानं होत असलेल्या घसरणीमुळे प्रमुख अब्जाधीशांच्या (Billionaires) संपत्तीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे अब्जाधीशांच्या क्रमवारीतही बदल झाला आहे. दरम्यान, आता मुकेश अंबानी यांना मागे टाकत गौतम अदानी यांनी पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

यापूर्वी ही अदानी हे अंबानी यांना मागे टाकण्याच्या रेसमध्ये होते. परंतु त्यांना अंबानींना मागे टाकता आलं नाही. आता गौतम अदानी जगातील १० श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले आहेत.

फोर्ब्सच्या रिअल टाइम यादीनुसार, गौतम अदानी आणि कुटुंब सध्या ९० अब्ज डॉलर्स संपत्तीसह १० व्या क्रमांकावर आहे. गेल्या २४ तासांमध्ये त्यांची संपत्ती ६७२ डॉलर्स दशलक्षने कमी झाली असली तरी, इतर अन्य अब्जाधीशांना याचा अधिक फटका बसला आहे.

दीर्घकाळ भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अबानी यांच्या संपत्तीत गेल्या १ दिवसात २.२ अब्ज डॉलरची घट झाली आहे. यामुळे त्यांची एकूण संपत्ती ८९ अब्ज डॉलर्स झाली. मुकेश अंबानी आता जागतिक स्तरावर ११ व्या क्रमांकावर आणि भारत तसंच आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.

टेक कंपनी मेटाचे (Meta Formerly known as Facebook) मालक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या संपत्तीत गुरुवारी तब्बल २९ अब्ज डॉलर्सची घट झाली. ही एकाच दिवसातील संपत्तीतील सर्वात मोठी घसरण आहे. शेअर्सच्या किंमतीत झालेल्या घसरणीनंतर मार्क झुकरबर्ग यांच्या मालमत्तेतही मोठी घसरण झाली आहे.

मार्क झुकरबर्ग यांच्या वैयक्तिक संपत्तीत २९ अब्ज डॉलरची घट झाली आहे. मेटाच्या शेअर्सच्या किमतीत २६ टक्क्यांची घसरण झाल्यामुळे कंपनीच्या एकूण बाजार मूल्यात २०० अब्ज डॉलर्ची घसरण झाली.

ही अमेरिकन कंपनीसाठी एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. गेल्या वर्षीच कंपनीच्या नावात बदल करून फेसबुक (Facebook) ऐवजी ते मेटा (Meta) करण्यात आलं होतं.

फोर्ब्स मासिकानुसार, या घसरणीमुळे मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती ८५ अब्ज डॉलर्सवर आली आहे. तर दुसरीकडे त्याच दिवशी अब्जाधीश आणि अॅमेझॉन (Amazon) चे प्रमुख जेफ बेझोस यांच्या संपत्तीत २० अब्ज डॉलर्सची वाढ झाली.

जेफ बेझोस यांची ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनमध्ये सुमारे ९.९ टक्के भागीदारी आहे. अॅमेझॉनला अलीकडेच इलेक्ट्रीक वाहन निर्माती कंपनी रिव्हियनमधील गुंतवणुकीचा फायदा झाला आणि त्याचा चौथ्या तिमाहीचा नफा वाढला.

यासोबतच कंपनीने अमेरिकेतील प्राईम व्हिडीओ सेवेच्या सबस्क्रिप्शनची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली.

गुरुवारी झालेल्या घसरणीनंतर मार्क झुकरबर्ग आता फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत १२ व्या क्रमांकावर गेले आहेत. सध्या त्यांच स्थान भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्याही खाली आलं आहे.