गुंतवणूकदारांना कमाईची तिहेरी संधी! ‘या’ कंपन्यांचे IPO येतायत; जाणून घ्या, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 01:58 PM2022-05-15T13:58:05+5:302022-05-15T14:02:26+5:30

LIC चा IPO लागला नाही, तरी निराश व्हायचे कारण नाही. कारण आता या आठवड्यात ३ कंपन्या आपले आयपीओ सादर करणार आहेत.

आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत अनेविध क्षेत्रातील विविध कंपन्या आपले IPO सादर करत आहे. बहुचर्चित LIC चा IPO सादर झाला असून, १७ मे रोजी लिस्टिंग होणार आहे.

LIC चे शेअर मिळणारे ते भाग्यवान गुंतवणूकदार कोण हे आता कळेल. गुंतवणूकदारांनी एलआयसीच्या आयपीओला तुफान प्रतिसाद दिला. अगदी अँकर गुंतवणूकदारांपासून ते विमाधारकांपर्यंतचे गुंकवणूकदार आयपीओवर तुटून पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

LIC चा IPO लागला नाही, तरी निराश व्हायचे कारण नाही. कारण आता या आठवड्यात तीन कंपन्या आपले आयपीओ सादर करणार आहेत. गुंतवणूकदरांसाठी कमाईची ही तिहेरी संधी आहे.

फर्टिलायजर कंपनी पारादीप फॉस्फेटस कंपनीचा आयपीओ १७ मे, महागडी घड्याळ बनवणारी कंपनी एथोसचा आयपीओ १८ मे आणि ई मुद्राचा आयपीओ २० मे रोजी येणार आहे. या तीन कंपन्यांची मार्केट साईज २३८७ कोटी रुपये आहे.

पारादीप फॉस्फेटस लिमिटेड कंपनीचा आयपीओ १७ मे रोजी येणार आहे. हा आयपीओ १५०१ कोटी रुपयांचा असले. यासाठी कंपनीनं प्राईस बँड ३९ ते ४२ रुपयांदरम्यान निश्चित केला आहे. या आयपीओद्वारे केंद्र सरकार या कंपनीतील त्यांची १९.५५ टक्के हिस्सेदारी विकणार आहे.

हा आयपीओ १९ मे रोजी बंद होणार आहे. या आयपीओद्वारे १००४ कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी केले जातील. प्रमोटर्स आणि इतर शेअरधारक ११.८५ कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स विक्रीसाठी आणतील.

महागड्या घड्याळांची निर्मिती करणारी कंपनी एथोसचा आयपीओ १८ मे रोजी येणार आहे. या आयपीओची साईज ४७२ कोटी रुपये आहे. या आयपीओची प्राईस बँड ८३६ ते ८७८ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. हा आयपीओ २० मे रोजी बंद होणार आहे.

या आयपीओतून ३७५ कोटी रुपयांची उभारणी करण्याचं उद्दिष्ठ निश्चित करण्यात आलं आहे. याशिवाय ११ लाख ८ हजार ३७ इक्विटी शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे. या आयपीओतून मिळणाऱ्या रकमेचा वापर कर्जाची परतफेड आणि इतर कारणांसाठी करण्यात येणार आहे.

ईमुद्रा आयपीओ २० मे रोजी खुला होईल. या आयपीओवर २४ मे पर्यंत बोली लावता येणार आहे. सार्वजनिक गुंतवणूकीद्वारे ४७२ कोटी रुपयांची उभारणी करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. या आयपीओची प्राइस बँड २४३ ते २५६ रुपये प्रति इक्विटी शेअर इतकी ठेवण्यात आली आहे. ईमुद्रा आयपीओ बंगळुरु येथील कंपनीचा आहे. सध्याचे कंपनीचे शेअर्सधारक आणि प्रमोटर्स ९८.३५ लाख शेअर्सची विक्री करणार आहेत.