बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी आपलीच सॅलरी केली कमी, कोण आहेत सतीश मल्होत्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 09:29 AM2023-10-02T09:29:43+5:302023-10-02T09:51:14+5:30

आज आम्ही तुम्हाला व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्याबद्दल ऐकून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.

जागतिक बाजारपेठेत मंदीचा धोका असताना, मोठ्या कंपन्या मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांनी मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. पण आज आम्ही तुम्हाला व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्याबद्दल ऐकून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.

सध्या सोशल मीडियावरही त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यासाठी आपला पगार कमी करण्याचा निर्णय घेतलाय. बॉस आपला पगार कमी करून कर्मचाऱ्याला वेतनवाढ देतो असं क्वचितच ऐकलं असेल.

द कंटेनर स्टोअरचे सीईओ सतीश मल्होत्रा यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. त्यांच्या निर्णयाचं अनेकांकडून कौतुकही होतंय. सध्या अशी वेळ आहे जेव्हा अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ देत आहेत. परंतु सतीश मल्होत्रा यांनी आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यासाठी आपल्या वेतनात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला.

कंपनीवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण पडू नये यासाठी त्यांनी पुढील सहा महिन्यांपर्यंत आपल्या वेतनात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतलाय. फेब्रुवारी २०२१ पासून सतीश मल्होत्रा कंपनीची धुरा सांभाळत आहेत.

त्यांनी कठीण काळातही आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली आहे. कर्मचारी कपात करावी लागू नये यासाठी त्यांनी आपल्या वेतनात कपात करून खर्च कमी करण्याचा प्रयत्न केलाय. सध्या मल्होत्रा यांच्या या निर्णयाचं अनेक जणांकडून कौतुक होत आहे.

फॉर्च्युन रिपोर्टनुसार सतीश मल्होत्रा यांचं वेतन ९,२५,००० डॉलर्स म्हणजे जवळपास ७,६८,७२,१२५ रुपये आहे. यात पुढील सहा महिन्यांपर्यंत कपात करण्यात आली असून आता ती ८,३२,५०० डॉलर्स होणार आहे.

गेल्या वर्षी त्यांना एकूण कंपेनसेशनच्या मोबदल्यात २.५७ मिलियन डॉलर्स मिळाले होते. त्यांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे, परंतु त्यांच्या वेतनात किती कपात करण्यात आली होती याची माहिती मात्र समोर आलेली नाही.

सतीश मल्होत्रा यांच्याशिवाय अॅपलचे सीईओ टीम कुक आणि गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आपल्या वेतनात कपात केली होती. परंतु या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली आहे. अशातच कर्मचाऱ्यांसाठी मल्होत्रा यांनी मात्र वेतनात कपात केल्याची माहिती समोर आलीये.