Vodafone-Idea : कंपनीकडे नाही 5G; पण जिओ, एअरटेलविरोधात तक्रार करायला पोहोचली व्होडाफोन आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 02:04 PM2023-04-26T14:04:51+5:302023-04-26T14:10:55+5:30

पाहा नक्की काय आहे प्रकरण. व्होडाफोन आयडियानं यासंदर्भात ट्रायकडे तक्रार केली आहे.

सध्या दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया ही देशातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची कंपनी रिलायन्स जिओ आणि एअरटेलविरोधात उभी ठाकली आहे. सध्या एअरटेल आणि रिलायन्स जिओ या कंपन्या देशभरात 5G सेवा ऑफर करत आहेत.

सध्या Jio आणि Airtel त्यांच्या ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा मोफत देत आहेत. या विरोधात Vi ने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI कडे तक्रार केली आहे.

जर रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडून अनलिमिटेड मोफत 5G सेवा सुरू राहिली, तर आपल्याला स्पर्धेत राहता येणार नाही, असं कंपनीनं म्हटलंय. जिओ आणि एअरटेल या मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. अशातच त्या आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा ऑफर करू शकत नाही, असं व्होडाफोन आयडियाचं म्हणणं आहे.

ट्रायने या प्रकरणी जिओ आणि एअरटेलला उत्तर विचारलं होती. यावर दोन्ही कंपन्यांनी आपण 5जी डेटा मोफत देत नसल्याचं म्हटलंय.

यासाठी युझर्सना 249 रुपयांचे किमान रिचार्ज करावं लागेल. तसंच, ही ऑफर युझर्सना 5G इकोसिस्टमसोबत समन्वय साधण्यास मदत करत असल्याचं कंपन्यांनी म्हटलंय.

या प्रकरणात, जिओ आणि एअरटेलचा मोफत 5G डेटा वापरणारे युझर्स म्हणतात की स्पर्धा म्हणजे Vi ने देखील 5G ​​लाँच केले पाहिजे. तसंच मोफत 5G डेटा ऑफर केला पाहिजे. पण एखादी कंपनी स्वस्त किंवा मोफत डेटा देत असेल तर त्याला विरोध होऊ नये.

एअरटेलने भारतातील 500 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. तर Jio चे 5G कव्हरेज 400 शहरांपर्यंत आहे. दोन्ही कंपन्या 5G सेवा मोफत देत आहेत. दरम्यान, यासाठी 249 रुपयांचे किमान 4G रिचार्ज करणं अनिवार्य आहे.