चहा १० रुपये, वडापाव २० रुपये! विमानतळावर आता मिळणार रेल्वे दरात नाश्ता; कसा घ्यायचा लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:54 IST2025-12-30T14:45:31+5:302025-12-30T14:54:05+5:30

Udan Yatri Cafe : विमानतळावर गेल्यानंतर साधारणपणे चहासाठी १५० ते २५० रुपये मोजावे लागतात. मात्र, सरकारच्या विशेष पुढाकारामुळे आता प्रवाशांना रेल्वे स्थानकाप्रमाणेच रास्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत.

सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल अशा दरात विमान प्रवास करता यावा, या उद्देशाने सरकारने 'उडान यात्री कॅफे' ही योजना सुरू केली आहे. या कॅफेमध्ये दर्जेदार खाद्यपदार्थ अत्यंत कमी किमतीत मिळतात.

या कॅफेचे दर पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. इथे चहा फक्त १० रुपयांत मिळतो. तसेच पाण्याची बाटली १० रुपये, तर कॉफी, समोसा आणि वडापाव यांसारखे पदार्थ फक्त २० रुपयांत उपलब्ध आहेत.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हे कॅफे विमानतळाच्या आत 'डिपार्चर एरिया'मध्ये बोर्डिंग गेटच्या अगदी जवळ सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाश्त्यासाठी बाहेर जाण्याची गरज पडत नाही.

या योजनेची सुरुवात सर्वप्रथम कोलकाता विमानतळावरून करण्यात आली होती. प्रवाशांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे सरकारने या योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या कोलकातासह चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे यांसारख्या मोठ्या विमानतळांवर ही सुविधा सुरू झाली आहे. लवकरच देशातील इतर लहान-मोठ्या विमानतळांवरही असे कॅफे पाहायला मिळतील.

हवाई प्रवास आता केवळ श्रीमंतांचा राहिलेला नाही. मध्यमवर्गीय आणि पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही योजना वरदान ठरत असून, त्यांच्या खिशावरचा भार यामुळे कमी झाला आहे.

हवाई प्रवास आता केवळ श्रीमंतांचा राहिलेला नाही. मध्यमवर्गीय आणि पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही योजना वरदान ठरत असून, त्यांच्या खिशावरचा भार यामुळे कमी झाला आहे.