TCS : सहा महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा वेतन वाढीची घोषणा, ४.७ लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 01:00 PM2021-03-20T13:00:38+5:302021-03-20T13:06:28+5:30

TCS Salary Hike : यापूर्वीही कोरोना काळात कंपनीनं केली होती कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, या कालावधीत वेतनवाढ करणारी ठरली होती पहिली कंपनी.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज म्हणजे TCS ही देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी म्हणून ओळखली जाते. दरम्यान, कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा एक खूशखबर दिली आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेजनं आपल्या पुढील आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आपल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करण्याची घोषणा केली आहे.

हा निर्णय घेणारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज ही देशातील पहिली आयटी कंपनी आहे. कंपनीच्या या निर्णयाचा फायदा कंपनीत काम करणाऱ्या ४.७ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या ऑफशोअर कर्मचाऱ्यांच्या वेतनात ६-७ टक्के वेतनवाढ होऊ शकते. कंपनीनं सहा महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेजच्या प्रवक्त्यांनीदेखील कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

कंपनीच्या बेंचमार्कनुसार आर्थिक वर्ष २०२१-२२ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज जगभरातील सर्व कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

२०२१-२२ या आर्थक वर्षात वेतन वाढीच्या वेळेपासून सहा महिन्यांच्या कालावधीत कर्मचाऱ्यांना सरासरी १२ ते १४ टक्क्यांच्या जवळपास वेतनवाढ मिळेल असं सूत्रांकडून सांगण्यात आलं.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेजनं गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांच्य वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळीदेखील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करणारी ती पहिली आयटी कंपनी ठरली होती.

करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही कंपनीनं आपल्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांची वेतनवाढ केली होती.

याव्यतिरिक्त टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नतीही देत असते.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेजच्या वेतनवाढीच्या निर्णयानं कंपनीनं नॉर्मल इन्क्रिमेंटल सायकलचे संकेत दिल्याचंही जाणकारांचं म्हणणं आहे.

सुरू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत टीसीएसनं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. कंपनीची महसूल वाढही गेल्या ९ वर्षांत सर्वाधिक राहिली आहे.

सुरू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कॉन्स्टंट करन्सीच्या टर्ममध्ये कंपनीची महसूल वाढ तिमाही आधारावर ४.१ टक्के इतकी आहे. आर्थिक वर्ष २०११ नंतर ही सर्वाधिक वाढ आहे.

यापूर्वी आणखी एका आयटी कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नाही पण बोनस देण्याची घोषणा केली होती.

आयटी कंपनी अॅक्सेंचरनं आपल्या कर्मचाऱ्यांना एका आठवड्याच्या वेतनाच्या मूळ वेतनाइतकं बोनस देण्याची घोषणा केली होती.

Read in English