टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 22:06 IST2025-07-17T22:03:06+5:302025-07-17T22:06:39+5:30
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इंडियन हॉटेल्सने २९६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे...

टाटा समूहाची हॉटेल कंपनी असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या (IHCL), पहिल्या तिमाहीतील एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इंडियन हॉटेल्सने २९६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत टाटा समूहाच्या या हॉटेल कंपनीला २४८ कोटी रुपयांचा नफा झाला होता. गुरुवारी एनएसईवर इंडियन हॉटेल्सचा शेअर ७५५.१० रुपयांवर बंद झाला. गेल्या ५ वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये ८८० टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे.
32% वाढलाय कंपनीचा महसूल - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या महसुलात वार्षिक आधारावर ३२% वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल २१०२ कोटी रुपये राहिला. जो गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १५९६ कोटी रुपये होता.
ऑपरेटिंग लेव्हलवर, कंपनीचा EBITDA २९% वाढून ६३७ कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत, कंपनीचा EBITDA ४९६ कोटी रुपये होता. तिमाही दरम्यान, EBITDA मार्जिन ७० बेसिस पॉइंट्सने कमी होऊन ३०.३% उरले आहे, जे जून २०२४ च्या तिमाहीत ३१% होते.
महत्वाचे म्हणजे, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इंडियन हॉटेल्सने सहा नवीन हॉटेल्स सुरू केल्या आहेत.
पाच वर्षांत दिला 880% परतावा - गेल्या पाच वर्षांत इंडियन हॉटेल्सच्या शेअर्समध्ये ८८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. १७ जुलै २०२० रोजी टाटा ग्रुपच्या या हॉटेल कंपनीचा शेअर एनएसईवर ७६.९९ रुपयांवर होता. जो १७ जुलै २०२५ रोजी ७५५.१० रुपयांवर बंद झाला.
गेल्या चार वर्षांचा विचार करता, इंडियन हॉटेल्सचा शेअर ४०९ टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या तीन वर्षांत २०१ टक्क्यांनी वधारला आहे. तर गेल्या दोन वर्षांत हा शेअर ९२ टक्क्यांनी वधारला आहे.
हॉटेल कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८९४.९० रुपये आहे. तर ५२ आठवड्यांचा नीचांक ५७१.०५ रुपये एवढा आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)