ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 14:25 IST2025-08-13T14:21:24+5:302025-08-13T14:25:35+5:30

Suresh Raina Net Worth : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना बुधवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाला. या घटनेमुळे त्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि आलिशान जीवनशैली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि 'मिस्टर आयपीएल' म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना सध्या एका मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे. १xBet नावाच्या एका ऑनलाइन बेटिंग ॲपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याला समन्स बजावले आहे.

या चौकशीसाठी रैना बुधवारी दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाला. या घटनेमुळे त्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि आलिशान जीवनशैली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, सुरेश रैना याची एकूण संपत्ती २२० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याच्या या प्रचंड संपत्तीमागे उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत आहेत.

रैनाने आपल्या लांब आणि यशस्वी क्रिकेट कारकिर्दीतून मोठी कमाई केली. विशेषतः इंडियन प्रीमियर लीग मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याला ११० कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली. आयपीएल व्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी खेळतानाही त्याला मोठं मानधन मिळत होते.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, सुरेश रैनाने समालोचन क्षेत्रात उडी घेतली. यामुळे त्याच्या उत्पन्नात आणखी वाढ झाली आहे. यासोबत अॅडिडास, बूस्ट, टाइमेक्स यांसारख्या अनेक मोठ्या ब्रँड्सचे प्रमोशन केले आहे, जे त्याच्या कमाईचे एक महत्त्वाचे स्त्रोत आहे.

'रैना मेट' नावाचा त्याचा एक बेबीकेअर ब्रँड असून त्याने 'साहिकोइन' नावाच्या स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली आहे. सर्वात नवीन व्यवसाय म्हणजे नेदरलँड्समधील आम्सटरडॅममध्ये उघडलेले त्याचे 'रैना इंडियन रेस्टॉरंट'. या रेस्टॉरंटचा उद्देश युरोपमधील लोकांना अस्सल भारतीय जेवणाची चव देणे आहे.

ईडीच्या चौकशीमुळे रैनासमोर आता नवीन आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणी तो काय भूमिका घेतो आणि भविष्यात त्याच्यावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.