पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:56 IST2025-08-07T11:50:20+5:302025-08-07T11:56:58+5:30

Sukanya Samriddhi Yojana : जर तुम्हाला तुमच्या मुलीच्यासाठी भविष्यासाठी मोठा निधी जमा करायचा असेल. तर पोस्ट ऑफिसची एक योजना नक्कीच मदतीला येईल.

प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असते. मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पैशांची कमतरता भासू नये, असे त्यांना वाटते.

जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक योजना शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना तुमच्यासाठी उत्तम आहे. यात परताव्याची हमी मिळते आणि जोखीम खूप कमी असते.

सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची खास योजना आहे, जी मुलींचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी बनवली आहे. मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी असताना तिच्या नावाने हे खाते उघडता येते.

या योजनेत दरवर्षी कमीतकमी २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दरमहा किंवा वर्षाला पैसे भरू शकता.

या योजनेत तुम्ही ७० लाख रुपये कसे मिळवू शकता? जर तुम्ही दरमहा १२,५०० रुपये (वर्षाला १.५ लाख रुपये) गुंतवले, तर हे शक्य आहे.

उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या मुलीच्या ५ व्या वर्षी खाते उघडले आणि १५ वर्षे सलग पैसे भरले, तर तुमची एकूण गुंतवणूक २२.५ लाख रुपये होईल.

ही योजना चक्रवाढ व्याज देते. सध्याचा व्याजदर ८.२% आहे, जो इतर योजनांपेक्षा चांगला आहे. २१ वर्षांनंतर ही रक्कम सुमारे ६९.२७ लाख रुपये होईल, ज्यात सुमारे ४६.७७ लाख रुपये फक्त व्याज असेल.

या योजनेत मिळालेले व्याज पूर्णपणे करमुक्त असते. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर शिक्षणासाठी काही पैसे काढता येतात, आणि २१ वर्षे पूर्ण झाल्यावर संपूर्ण रक्कम मिळते.