वडिलांचे पैसे वाचवण्यासाठी पोरानं 'असा' जुगाड केला; ८००० कोटीचं साम्राज्य उभारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 08:46 AM2024-02-29T08:46:43+5:302024-02-29T08:51:12+5:30

रिकांत पिट्टी यांनी व्यावसायिक जगतात मोठं यश संपादन केलं आहे. ते EaseMyTrip चे सह-संस्थापक आहेत. पिट्टी यांनी एका साध्या कल्पनेचे रूपांतर ८००० कोटी रुपयांच्या कंपनीत केले. ट्रॅव्हल एजंट वास्तविक तिकिटांच्या किमतींपेक्षा कितीतरी जास्त शुल्क आकारत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांचा या व्यवसायात प्रवास सुरू झाला.

रिकांत पिट्टी यांच्या वडिलांना व्यवसायासाठी सतत फ्लाइट बुक करावी लागत होती. पैसे वाचवण्यासाठी रिकांत पिट्टी यांनी स्वत: ऑनलाइन तिकीट बुक करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांना त्यात व्यवसायाच्या संधी दिसल्या. येथून त्यांचा प्रवास सुरू झाला. चला, मग रिकांत पिट्टींच्या यशाबद्दल जाणून घेऊया.

रिकांत पिट्टी हे इंजिनिअरींगचे विद्यार्थी होते. व्यवसायाच्या संदर्भात, त्यांच्या वडिलांना महिन्यातून अनेक वेळा विमानाने प्रवास करावा लागत. ट्रॅव्हल एजंट ऑनलाइन तिकिटाच्या किमतीपेक्षा १५०० रुपये जास्त आकारायचे. त्यामुळे काही पैसे वाचवण्यासाठी रिकांतने स्वतः वडिलांसाठी तिकीट बुक करायला सुरुवात केली.

रिकांत यांचे वडील महिन्याला १५ फ्लाईटचे तिकीट खरेदी करत होते, त्यासाठी त्यांना अतिरिक्त २० हजार रुपये द्यावे लागत होते. त्यामुळे रिकांतने वडिलांचे हे पैसे वाचवण्यासाठी स्वत: तिकीट बुक करणे सुरू केले. त्यानंतर वडिलांचे बरेच पैसे वाचले

केवळ वडिलांसाठीच नाही तर त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठीही तिकिटे बुक करण्यास सुरुवात केली. जेव्हा एअरलाइन्सच्या लक्षात आले की ते एकाच खात्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात तिकिटे बुक करत आहे, तेव्हा त्यांनी रिकांत पिट्टी यांच्याशी संपर्क साधला.

तोपर्यंत रिकांतच्या लक्षात आले होते की हा एक चांगला व्यवसाय आहे. संधी स्वतःच त्यांच्याकडे चालून आली. रिकांतने महाविद्यालयीन विद्यार्थी असतानाच ड्यूक ट्रॅव्हल्स नावाची ट्रॅव्हल एजन्सी उघडली. EaseMyTrip (EMT) ची सुरुवात झाली जेव्हा रिकांतने पूर्व दिल्लीत त्याच्या भावासोबत शेअर केलेल्या सिंगल-बेडरूम अपार्टमेंटमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

याशिवाय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 'नो कन्व्हिनियन्स फी' आणि 'झिरो हिडन चार्जेस' ऑफर करण्यात आली होती. यानंतर, EaseMyTrip ने एका वर्षात दररोज २० हजारापेक्षा जास्त विमान तिकिटे विकली. २०१५ पर्यंत कंपनीची विक्री १५०० कोटी रुपयांपर्यंत वाढली.

रिकांत पिट्टी आणि त्यांच्या दोन भावांच्या मेहनतीला फळ मिळाले. गेल्या महिन्यात, EasyMyTrip सह-संस्थापक रिकांत यांनी गुरुग्रामच्या सेक्टर ३२ मध्ये ९९.३४ कोटी रुपयांना व्यावसायिक मालमत्ता खरेदी केली होती. कधीही महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण न केलेला रिकांत आता ४.२२ कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी चालवतो.

EaseMyTrip ही भारतातील दुसरी सर्वात मोठी ट्रॅव्हल कंपनी आहे. सध्या त्यांच्याकडे ६१ हजार ट्रॅव्हल एजेंट आहेत. १० लाखाहून अधिक हॉटेल पार्टनर आहेत. इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक एकूण मिळून ४०० एअरलाईन्ससोबत टाय-अप आहेत. त्यांच्याकडे जवळपास ११ मिलियनहून अधिक ग्राहक आहेत.

रिकांत पिट्टी यांनी २०२१ मध्ये कंपनीचा आयपीओ शेअर मार्केटमध्ये आणला. त्याला गुंतवणूकदारांनीही चांगला प्रतिसाद दिला. या आयपीओची बेस्ड प्राईज १८६ ते १८७ रुपये प्रतिशेअर होती. त्याचे लिस्टिंग २१२.२५ रुपये झाले. मात्र आतापर्यंत दोनवेळा हा शेअर खाली पडला. २७ फेब्रुवारीला त्यांची किंमत ४८.९० रुपये होती.