Share Market Investment: १२ हजारांची गुंतवणूक अन् १ कोटींची कमाई! ‘या’ कंपनीच्या शेअरने कमालच केली; तुम्ही घेताय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 08:45 AM2023-01-06T08:45:16+5:302023-01-06T08:51:53+5:30

या फार्मा कंपनीचा व्यवसाय १२० हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. जाणून घ्या, डिटेल्स...

जगभरातील मंदीचे संकट, कोरोनाचा उद्रेक याचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर मार्केटवर पाहायला मिळत आहे. जगभरातील घडामोडींमुळे शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या अनेक दिवसांपासून घसरताना दिसत आहे. तरीही गुंतवणूकदार अनेकविध कंपन्यांवर आपला विश्वास कायम ठेवताना दिसत आहेत.

शेअर बाजारातील गुंतवणूक विचारपूर्वक करावी. कंपन्यांच्या आलेखाचा अभ्यास करून शेअर घ्यावा की नाही, हे ठरवावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. मात्र, शेअर मार्केटमध्ये अशा काही कंपन्या आहेत, ज्या मल्टिबॅगर कॅटेगरीत मोडतात. गुंतवणूकदारांचा विश्वास सार्थ ठरवत, त्यांना मालामाल करतात. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अशा कंपन्यांचा विचार केला जाऊ शकतो, असे म्हटले जाते.

शेअर बाजारात अशा काही कंपन्या सूचीबद्ध आहेत ज्या घसरणीनंतरही त्यांच्या ग्राहकांना चांगला परतावा देतात. फार्मा क्षेत्रातील दिग्गज इप्का लॅब (IPCA लॅब) चे शेअर्स एका वर्षाच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरले. पण दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे.

आताच्या घडीला इप्का लॅबचा शेअर ८५५ रुपयांवर व्यवहार करत आहे. एकीकडे बाजारात घसरण सुरू असताना या कंपनीच्या शेअरने गेल्या काही सत्रांमध्ये चांगली कामगिरी करत ४ टक्क्यांची वाढ नोंदवली. इप्का लॅबचे मार्केट कॅप २१,६६४.८६ कोटी रुपये आहे.

सुमारे २० वर्षांपूर्वी ७ डिसेंबर २००१ रोजी, IPCA लॅबच्या शेअर्सची प्किंमत फक्त ४.५० रुपये होती. मात्र, हाच शेअर आता ८५५ रुपयांवर पोहोचला आहे. इप्का कंपनीत तेव्हा गुंवतणूकदारांनी १२ हजार रुपये गुंतवले असते, तर आता त्याची किंमत १ कोटी रुपयांच्या घरात असती.

गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या वर्षी १० जानेवारी २०२२ रोजी या कंपनीचा शेअर ११२४.४० रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होता. परंतु, कालांतराने त्यात घसरण होत गेली. मात्र, हा शेअर आता रिकव्हर होत असून ८५५ रुपयांवर व्यवहार करत आहे. तसेच आतापर्यंत ३ टक्क्यांची वसुली या शेअरने करून दिली आहे.

इप्का लॅब हा वेदनादायी आजार, अँटीमलेरिया आणि हेअर केअर थेरपीमधील अग्रगण्य ब्रँड आहे. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, Ipca लॅब वेगवेगळ्या रोगांसाठी ३५० पेक्षा जास्त फॉर्म्युलेशन आणि ८० API तयार करते.

IPCA लॅबचा व्यवसाय १२० हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. यामध्ये जगभरात १५ API प्लांट आणि ११ फॉर्म्युलेशन प्लांट आहेत. IQVIA मे २०२० नुसार, भारतीय फार्मास्युटिकल मार्केटमधील टॉप ३०० ब्रँड्समध्ये IPCA लॅबचा समावेश आहे.

शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीची मानली जाते. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असे सांगितले जाते. (टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)