SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट! बँकेच्या 'या' 7 सेवांचा करता येणार नाही वापर; जाणून घ्या, तारीख आणि वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 09:28 AM2021-09-04T09:28:46+5:302021-09-04T09:39:55+5:30

State Bank of India : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. भारतीय स्टेट बँकेकडून 4 आणि 5 सप्टेंबर रोजी काही तासांसाठी ग्राहक इंटरनेट बँकिंगसह 7 प्रकारच्या सेवा वापरू शकणार नाहीत. या काळात या सेवा विस्कळीत होतील याबाबत माहिती देण्यात आली आहे.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 4 आणि 5 सप्टेंबरच्या रात्री देखभाल उपक्रमांसाठी या बँकिंग सेवा तीन तास बंद राहणार आहेत. या काळात एसबीआय ग्राहक या बँकिंग सेवा वापरू शकणार नाहीत. ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल एसबीआयने माफी देखील मागितली आहे.

"देखभाल उपक्रम 4 सप्टेंबर रोजी रात्री 22:35 ते 5 सप्टेंबर रोजी दुपारी 01:35 पर्यंत चालतील. या काळात इंटरनेट बँकिंग, YONO, YONO लाईट, YONO बिझनेस आणि IMPS आणि UPI सेवा उपलब्ध होणार नाहीत" असं एसबीआयने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. एसबीआय वेळोवेळी आपल्या डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मचं मेंटेनेंस करते. गेल्या महिन्यात देखभालीच्या कामांमुळे भारतीय स्टेट बँकेच्या सेवाही विस्कळीत झाल्या होत्या.

डिजिटल बँकिंग ग्राहकांना या काळात योनो, योनो लाईट, इंटरनेट बँकिंग, युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या सेवांचा लाभ मिळू शकत नाही. प्रत्येक वेळी बँकेकडून ग्राहकांना पूर्वसूचना दिली जाते. सध्या SBI YONO मध्ये एकूण 3.5 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत.

इतक्या मोठ्या संख्येने ग्राहक असल्यामुळे SBI रात्रीच्या वेळी देखभालीचे काम करते, जेणेकरून कमीतकमी ग्राहकांना त्याचा फटका बसेल. एसबीआयच्या एकूण यूपीआय वापरकर्त्यांची संख्या 13.5 कोटींपेक्षा जास्त आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेच्या एकूण 22,000 पेक्षा जास्त शाखा, 57,889 एटीएम देशभरात उपलब्ध आहेत. 31 डिसेंबर 2021 पर्यंत एसबीआयकडे 8.5 कोटी इंटरनेट बँकिंग ग्राहक आणि 1.9 कोटी मोबाईल बँकिंग युजर्स आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.