Reliance Petrol Pump to Shut Down: रिलायन्सचे पेट्रोलपंप पुन्हा बंद पडण्याची शक्यता; करोडो गुंतवणारे डीलर धास्तावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 11:30 AM2022-03-25T11:30:21+5:302022-03-25T12:05:58+5:30

Reliance Petrol Pump to Shut Down Again after 2008: रशिया-युक्रेन युद्धामुळे देशातील सर्वात बलाढ्य उद्योजक मुकेश अंबानींची कंपनी घायाळ झाली. २००८ च्या पुनरावृत्तीची भीती.

नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धाला महिना झालेला असताना आता भारताच्या एका बड्या कंपनीबाबत मोठी बातमी येत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने तेल कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. देशात रिलायन्स इंडस्ट्रीजचे पेट्रोल पंप पुन्हा एकदा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या आधी २००८ मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पंप बंद पडले होते. ते दोन-तीन वर्षांपूर्वीच पुन्हा सुरु करण्यात आले होते. आता रिलायन्सचे अनेक पेट्रोलपंपावरील इंधन साठा संपल्याने डीलर पुन्हा धास्तावले आहेत. एनबीटीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गुजरातच्या राजकोटमध्ये रिलायन्सचा पेट्रोलपंप आहे. या डीलरने मोठी भीती व्यक्त केली आहे. कोरोनामुळे आधीच रिलायन्सचा पंप चालत नाहीय. हालत आधीच खराब झालेली होती. आता पेट्रोल पंप बंद पडण्याच्या भीतीने चिंता वाढली आहे.

या डीलरने ईटीसोबत बोलताना सांगितले की, माझा पेट्रोल पंप गेल्या तीन दिवसांपासून ड्राय आहे. माझ्या भागातील डझनभर पेट्रोल पंपाचे मालक कंपनीच्या एरिया मॅनेजरला एसओएस मेसेज पाठवत आहेत. मात्र, आम्हाला कोणतेच उत्तर मिळत नाहीय. २००८ मध्ये देखील अशीच परिस्थिती आली होती. तेव्हा पेट्रोल पंप बंद करावे लागले होते.

२००८ मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती 150 डॉलर प्रति बॅरल झाल्या होत्या. यावेळी रिलायन्सने आपले १४०० पेट्रोल पंप बंद केले होते. या काळात मालकांना त्या जागेचे भाडे दिले जात होते. सरकारी कंपन्या तेव्हा सबसिडीवर पेट्रोल, डिझेल विकत होत्या. परंतू रिलायन्स खासगी कंपनी असल्याने तसे करू शकत नव्हती.

आताही सरकारी कंपन्यांना सरकारचे पाठबळ आहे. यामुळे त्या गेली चार महिने तोट्यात असूनही इंधन विकत होत्या. परंतू रिलायन्सने या काळात पेट्रोल पंपांना डिझेलचा पुरवठा निम्म्यावर आणला होता. आता तर ते देखील देणे बंद केले आहे.

अन्य एका डीलरने सांगितले की, गेल्या चार दिवसांत इंधनाचे दर 2.40 रुपये प्रति लीटर वाढले आहेत. मात्र, आमच्याकडे विकण्यासाठी इंधन नाहीय. माझे टँकर गेल्या सहा दिवसांपासून उभे आहेत. याबाबत ईटीने रिलायन्स बीपी मोबिलीटीला मेल केला तेव्हा कंपनीच्या प्रवक्त्याने देशभरात आमचे १४५८ पेट्रोल पंप असल्याचे सांगितले.

सरकारी तेल कंपन्यांना १९००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार डिझेलच्या किंमतींमध्ये 13.1 रुपये ते 24.9 रुपये वाढ तर पेट्रोलच्या किंमतीत 10.60 रुपये ते 22.30 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे.

रिलायन्स पेट्रोल पंपांची संख्या वाढवत आहे. अशातच ही वेळ आल्याने डीलरमध्ये खळबळ उडाली आहे. नुकसान भरून निघत नाही तोवर रिलायन्स हे पेट्रोल पंप बंद ठेवण्याची किंवा कमी पेट्रोल डिझेल पुरवठा सुरु ठेवण्याची शक्यता आहे. दर फायद्याच्या पातळीवर आले की पुन्हा हे पेट्रोलपंप सुरु होऊ शकतात.