Reliance Demerger: शेअर बाजारात आला अंबानींचा नवा शेअर, रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा १० पट आहे स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 12:24 PM2023-07-20T12:24:03+5:302023-07-20T12:40:45+5:30

Reliance Demerger: पाहा किती निश्चित करण्यात आलीये रिलायन्सच्या नव्या शेअरची किंमत आणि कधीपासून करता येणार ट्रेडिंग.

Reliance Demerger: स्टॉक एक्स्चेंजवरील विशेष प्री-ओपन कॉल ऑक्शन सेशन संपल्यानंतर एनएसईवर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या (Jio Financial) शेअरच्या बाजारभावाचे मूल्यांकन 261.85 रुपये प्रति शेअर करण्यात आलंय. डिमर्जर पाहता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 2,580 रुपयांपर्यंत घसरली.

रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेडच्या डिमर्जरनंतर अॅक्वायझेशन कॉस्ट 4.68 टक्के आहे. रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचं नाव बदलून आता ते जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड केलं जाणार असल्याचं आरआयएलनं सांगितलं.

बुधवारी बाजार बंद झाला तेव्हा बीएसईवर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 2,840 रुपये होती. ही किंमत विचारात घेतल्यास, अॅक्वायझेशन कॉस्ट 133 रुपयांपर्यंत खाली येते.

गुरुवारी सकाळी (आज) सकाळी 09 ते 09:45 पर्यंत बीएसई आणि एनएसईवर विशेष प्रो-ओपन ट्रेडिंग सत्रामध्ये डिमर्ज्ड होणाऱ्या कंपनीचे बाजार मूल्य मोजलं गेलं. या अंतर्गत, सकाळी 10 वाजेपर्यंत RIL च्या शेअरमध्ये कोणतेही सामान्य ट्रेडिंग झालं नाही.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचा प्रमुख निर्देशांकांमध्ये समावेश केला जाईल. परंतु या शेअरमधी ट्रेडिंग लिस्टिंग होईपर्यंत होणार नाही. या स्टॉकची लिस्टिंग येत्या दोन ते तीन महिन्यांत होऊ शकते आणि असे मानले जाते की रिलायन्सच्या आगामी एजीएममध्ये याची घोषणा केली जाऊ शकते.

बुधवार म्हणजेच 19 जुलैपर्यंत ज्यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स आहेत त्यांना 1:1 नुसार जेएफएसएलचे शेअर्स मिळण्यास पात्र असतील. उदा. जर तुमच्याकडे 19 जुलै रोजी आरआयएलचे 100 शेअर्स असतील तर तुम्हाला जेएफएसएलचे 100 शेअर्स मिळतील.

एनएसई जिओ फायनान्शिअलचा तात्पुरता समावेश निफ्टी50, निफ्टी100, निफ्टी200, निफ्टी500 आणि आणखी 15 निर्देशांकांमध्ये केला जाईल. लिस्ट होईपर्यंत जेएफएसएलच्या शेअरची किंमत तितकीच राहील.