Reliance कडून यावर्षी वेतन न घेण्याची मुकेश अंबानींची घोषणा; पाहा किती आहे त्यांचं वेतन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 08:01 PM2021-06-03T20:01:43+5:302021-06-03T20:08:52+5:30

Coronavirus : कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठीही घेतले महत्त्वाचे निर्णय.

सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता. सध्या देशातील परिस्थितीथी सुधारताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी यावर्षी वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मुकेश अंबानी यांनी कोणत्याही प्रकारचं वेतन घेतलं नाही. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे व्यापार आणि अर्थव्यवस्थेला बसलेल्या फटक्याच्या पार्श्वभूमीवर स्वेच्छेनं वेतन न घेण्याचा निर्णय घेतला.

कंपनीनं सादर केलेल्या अहवालानुसार २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी अंबानी यांनी कोणतंही वेतन घेतलं नाही. यापूर्वी गेल्या आर्थिक वर्षात त्यांना कंपनीकडून १५ कोटी रूपयांचं वेतन मिळालं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं वेतन १५ कोटी रूपयेच होतं.

तर मुकेश अंबानी यांचे बंधू निखिल आणि हिताल मेसवानी यांचं वेतन २४ कोटी रूपये कायम राहिलं आहे. परंतु यामध्ये यावेळी १७.२८ कोटी रूपयांचं कमिशन सामील आहे.

मुकेश अंबानी यांच्या कंपनीत कार्यकारी संचालक पदी कार्यरत असलेल्या पीएनएस प्रसाद आणि पवन कुमार कपिल यांच्या वेतनात वाढ झाली आहे. प्रसाद यांना २०२०-२१ या आर्थिक वर्षात ११.९९ कोटी रूपयांचं वेतन मिळालं. गेल्या वर्षी त्यांना ११.१५ कोटी रूपये वेतन मिळालं होतं.

मुकेश अंबनी यांच्या पत्नी नीता अंबानी या कंपनीत नॉन एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना प्रत्येक मीटिंगसाठी आठ लाख रूपये आणि १.६५ कोटी रुपयांचं कमिशन मिळालं.

याशिवाय उद्योगपती मुकेश अंबानी यांनीही कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिलायन्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत प्राप्त होणार आहे.

रिलायन्स कोरोनामुळं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला पुढील ५ वर्ष पूर्ण पगार देणार असून १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदतही देणार आहेत. तसेच दिवंगत कर्मचाऱ्यांच्या मुलांचा पदवीपर्यंत शिक्षणाचा आणि कुटुंबाचा खर्चही रिलायन्स उचलणार आहे.

कोरोना महामारीचं संकट पाहता मुकेश अंबानी यांनी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंपनी ५ वर्षापर्यंत पगार आणि मुलांच्या शिक्षणासाठी ट्यूशन फी, हॉस्टेलचा खर्च आणि पुस्तकांचा खर्च उचलणार आहे.

त्याशिवाय पदवीपर्यंत शिक्षण होईपर्यंत पती किंवा पत्नी, आईवडील आणि मुलांच्या हॉस्पिटालायजेशन कवरेज १०० टक्के प्रिमियम कंपनीकडून भरला जाईल. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला एकरकमी १० लाख रुपये दिले जातील.

ज्या कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे अथवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला संक्रमण झालं असेल तर शारिरीक, मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोविड १९ सुट्टी दिली जाऊ शकते.

ही सुट्टी पॉलिसीत वाढवण्यात आली असून रिलायन्सच्या सर्व कर्मचारी पूर्णपणे बरे होण्यासाठी किंवा कुटुंबातील कोविड १९ पॉझिटिव्ह सदस्यांची देखभाल करण्यावर फोकस करू शकतील.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English