एकेकाळी अंबानींपेक्षाही श्रीमंत होते, अशी विजयपत सिंघानीया यांनी गमावली १२००० कोटींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 08:51 AM2023-11-30T08:51:48+5:302023-11-30T09:16:42+5:30

'द कम्प्लीट मॅन' ते 'फील्स लाइक हेवन'च्या जोरावर देश-विदेशात आपला ठसा उमटवणारी कंपनी रेमंड सध्या पुन्हा चर्चेत आली आहे.

'द कम्प्लीट मॅन' ते 'फील्स लाइक हेवन'च्या जोरावर देश-विदेशात आपला ठसा उमटवणारी कंपनी रेमंड सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. केवळ ब्लँकेट विकणाऱ्या रेमंडला मोठा ब्रँड बनावणाऱ्या विजयपत सिंघानिया यांना आज त्यांच्याच उभ्या केलेल्या घरात राहता येत नाही. शंभर वर्षे जुनी कंपनी रेमंडचे संस्थापक विजयपत सिंघानिया आज भाड्याच्या घरात आपलं जीवन जगतायत. त्यांचं घर अँटिलियापेक्षाही मोठं होतं. परंतु आज त्यांच्याकडे ना घर आहे ना गाडी.

रेमंडला घरोघरी पोहोचवणाऱ्या व्यक्तीला स्वत: बेघर व्हावे लागलं. विजयपत सिंघानिया यांनी आपल्या हाती काहीच उरलं नसल्याची वस्तुस्थिती मान्य केली आहे. ते कठीण परिस्थितीत जगत आहे. त्यांची कंपनी आज मोठ्या उंचीवर आहे, पण विजयपत सिंघानिया यांच्याकडे काहीच उरलेलं नाही. जे एकेकाळी आपल्या प्रायव्हेट प्लेनमध्ये प्रवास करायचे, त्यांच्याकडे आज गाडीही नाही. एकेकाळी १२ हजार कोटींच्या संपत्तीचे मालक असलेल्या विजयपत सिंघानिया यांनी आपली सर्व संपत्ती आपल्या मुलाला देऊन सर्वात मोठी चूक केली. जाणून घेऊ काय आहे विजयपत सिंघानियांची ही कहाणी...

शंभर वर्षांपूर्वी रेमंडचा प्रवास मुंबईतून सुरू झाला. १९०० मध्ये महाराष्ट्रातील ठाण्यात एक वूलन मिल होती, जिथे ब्लँकेट बनवले जात होते. नंतर तेथे लष्कराच्या जवानांसाठी गणवेश तयार केले जाऊ लागले. १९२५ मध्ये मुंबईतील एका व्यावसायिकानं ही मिल विकत घेतली, मात्र काही वर्षांनी १९४० मध्ये कैलाशपत सिंघानिया यांनी ही मिल त्यांच्याकडून विकत घेतली. त्यांनी मिलचं नाव बदलून वाडिया मिलवरून रेमंड मिल केलं. राजस्थानमधून कानपूरला स्थलांतरित झालेले सिंघानिया कुटुंब जेके कॉटन स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स कंपनी चालवत होते. ब्रिटनमधून येणाऱ्या कापडाशी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी आता रेमंड मिलचा वापर केला.

कैलाश सिंघानिया यांनी फॅब्रिकवर लक्ष केंद्रित केलं आणि स्वस्त कपडे बनवायला सुरुवात केली. १९५८ मध्ये त्यांनी मुंबईत पहिलं रेमंडचं शोरूम उघडलं. १९६० मध्ये त्यांनी परदेशी मशीन्स आयात केल्या आणि त्यापासून कपडे बनवायला सुरुवात केली. १९८० मध्ये रेमंडची कमान विजयपत सिंघानिया यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी कंपनीची जबाबदारी चांगल्या प्रकारे हाताळली आणि रेमंडचा विस्तार सुरू ठेवला. १९८६ मध्ये सिंघानिया यांनी फॅब्रिक व्यवसायासोबत पार्क अव्हेन्यू हा परफ्यूम ब्रँड लाँच केला. देशाबरोबरच परदेशातही विस्तारावर त्यांचा भर होता. १९९० मध्ये विजयपत सिंघानिया यांनी भारताबाहेर पहिलं शोरूम उघडलं.

विजयपत सिंघानिया यांनी २०१५ मध्ये रेमंडची कमान त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपवली होती. त्यांनी आपले सर्व शेअर्स आपल्या मुलाच्या नावावर ट्रान्सफर केले. त्यावेळी त्या शेअर्सची किंमत १००० कोटी रुपये होती. गौतम यांनी कंपनीचा पदभार स्वीकारताच त्याचे परिणाम दाखवायला सुरुवात केली. वडील आणि मुलाचं नातं बिघडू लागलं. एका फ्लॅटवरून दोघांमध्ये एवढा वाद झाला की प्रकरण कोर्टात पोहोचलं. फ्लॅटचा वाद इतका वाढला की मुलानं वडिलांना घराबाहेर काढून टाकलं. विजयपत सिंघानिया यांनी मुंबईतील एका पॉश भागात जेके हाऊस नावाचं आलिशान घर बांधलं, परंतु त्यांच्या मुलानं त्यांना त्या घरातून बाहेर काढलं आणि भाड्याच्या घरात राहण्यास भाग पाडलं.

रेमंडचे संस्थापक विजयपत सिंघानिया यांनी स्वत: कबूल केलं की सर्व संपत्ती आणि संपूर्ण व्यवसाय आपल्या मुलाकडे सोपवून आपण सर्वात मोठी चूक केली होती. एकेकाळी १२,००० कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक असलेले सिंघानिया आज दक्षिण मुंबईतील ग्रँड पारडी सोसायटीत भाड्याच्या घरात राहण्यास भाग पडलंय. मुलानं त्याच्याकडून कार आणि ड्रायव्हर दोन्हीही काढून घेतलं.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, फ्लॅटच्या वादातून वडील आणि मुलाचं नातं इतके बिघडले की मुलाने वडिलांना घराबाहेर काढलं. विजयपत सिंघानिया यांनी मलबार हिल्समधील त्यांच्या डुप्लेक्स घरावर हक्क मागितला होता. यावरून पिता-पुत्रांमध्ये वाद वाढत गेला.

बिझनेस टुडेला दिलेल्या मुलाखतीत विजयपत सिंघानिया म्हणाले की, त्यांनी सर्वकाही त्यांच्या मुलाकडं सोपवलं, पण त्यांच्या मुलानं त्यांच्याकडून सर्व काही हिसकावून घेतले. त्यांनं मला कंपनीचा काही हिस्सा देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु नंतर तेही केलं नाही. आपल्याला रस्त्यावर पाहून त्याला खूप आनंद झाला असेल असंही त्यांनी म्हटलं. त्यांनी गौतम सिंघानिया यांचं रागिट, लोभी आणि गर्विष्ठ व्यक्ती असं वर्णन केलं. आपली सर्व संपत्ती आपल्या मुलाकडे सोपवणं ही आपली सर्वात मोठी चूक असल्याचं ते म्हणाले.