रेल्वे मंत्रालयाकडून या कंपनीला ९५७ कोटींची ऑर्डर; शेअरने पकडला बुलेट ट्रेनचा स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 04:20 PM2024-03-07T16:20:07+5:302024-03-07T16:34:30+5:30

Jupiter Wagons News: रेल्वे कंपनी ज्युपिटर वॅगन्सचे शेअर्स बुलेट ट्रेनप्रमाणे सुस्साट धावले आहेत.

एखाद्या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली की त्याचा परिणाम शेअर बाजारात दिसून येतो. मोठी डील मिळताच कंपन्यांच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ होते. आता रेल्वे कंपनी ज्युपिटर वॅगन्सचे (Jupiter Wagons) शेअर्स बुलेट ट्रेनप्रमाणे सुस्साट धावले आहेत.

ज्युपिटर वॅगन्सचा शेअर गुरुवारी ९ टक्क्यांहून अधिक वाढून ३९६.५० रुपयांवर पोहोचला. कंपनीला रेल्वे मंत्रालयाकडून ९५७ कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे.

ही ऑर्डर BOSM वॅगन्सच्या उत्पादनासाठी आणि पुरवठ्यासाठी आहे. खरं तर या वॅगन्सचा वापर माल वाहतूक करण्यासाठी केला जातो. ज्युपिटर वॅगन्सचा शेअर बुधवारी ३६१.९० रुपयांवर बंद झाला होता.

कंपनीला ऑर्डर मिळताच शेअरच्या किमतीत वाढ झाली. ज्युपिटर वॅगन्सने सांगितले की, कंपनीला २२३७ BOSM वॅगन्सचे उत्पादन आणि पुरवठा करण्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे.

या वॅगन्सचा वापर कोळसा, धातू यांच्या मालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यासाठी केला जातो. हे डब्बे अवजड सामानाची वाहतूक करण्यासाठी विशेष यंत्रणेसह डिझाइन केलेले आहेत. जेणेकरून सामानाची वाहतूक करणे सोयीस्कर होईल.

कोलकाता स्थित कंपनी ज्युपिटर वॅगन्स रेल्वेचे मालवाहू डब्बे, प्रवासी डब्बे, डब्ब्यांशी संबंधित इतर घटक, स्टील क्रॉसिंग आणि कास्टिंग्ज तयार करते. भारतीय रेल्वेसह अनेक खासगी कंपन्या या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत आहेत.

दरम्यान, ज्युपिटर वॅगन्सच्या शेअर्समध्ये मागील ४ वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. चार वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ५००० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. २७ मार्च २०२० रोजी ज्युपिटर वॅगन्सचे शेअर्स ७.३२ रुपयांवर होते.

आताच्या घडीला रेल्वे कंपनीचे शेअर्स ७ मार्च २०२४ रोजी ३९६.५० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये २७० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

८ मार्च २०२३ रोजी ज्युपिटर वॅगन्सचे शेअर्स १०२.२७ रुपयांवर होते. तर, ७ मार्च २०२४ रोजी कंपनीचे शेअर्स ३९६.५० रुपयांवर पोहोचले आहेत.

ज्युपिटर वॅगन्सच्या शेअरची ५२ आठवड्यांची उच्च पातळी ४३३.९५ रुपये आहे. त्याच वेळी ज्युपिटर वॅगन्सच्या शेअरची मागील ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ८५.३७ रुपये आहे.