PPF, NPS अन् होम लोन; ३१ मार्चपूर्वी पूर्ण करा 'ही' ५ महत्त्वाची आर्थिक कामे, अन्यथा मोठा दंड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 16:12 IST2026-03-22T16:05:56+5:302026-03-22T16:12:18+5:30

कर आणि गुंतवणुकीशी संबंधित काही महत्त्वाची आर्थिक कामे पूर्ण करणे आवश्यक आहे.

Financial Year : आर्थिक वर्ष २०२५-२६ हे ३१ मार्च २०२६ रोजी संपणार असून, त्यापूर्वी कर आणि गुंतवणुकीशी संबंधित काही महत्त्वाची आर्थिक कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. ही कामे वेळेत पूर्ण केली नाहीत, तर कर सवलती मिळणार नाहीत आणि जास्त कर भरावा लागू शकतो. त्यामुळे करदात्यांनी ३१ मार्चपूर्वी आवश्यक कागदपत्रे आणि गुंतवणूक पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

१. इन्व्हेस्टमेंट प्रूफ जमा करा- जर तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला कर बचतीसाठी गुंतवणूक केली असेल, तर त्याचे पुरावे (Investment Proof) ३१ मार्चपूर्वी कंपनी किंवा नियोक्त्याला जमा करणे आवश्यक आहे. हे कागदपत्रे वेळेत जमा न केल्यास तुमचे करपात्र उत्पन्न (Taxable Income) जास्त धरले जाऊ शकते आणि जास्त कर कापला जाऊ शकतो.

२. आरोग्य विमा प्रीमियम भरणे- आयकर कायद्याच्या कलम ८०D अंतर्गत आरोग्य विम्यावर कर सवलत मिळते. कुटुंबासाठी - २५,००० रुपये, ज्येष्ठ नागरिकांसाठी - ५०,००० रुपये आणि आई-वडिलांसाठी - ७५,००० रुपयांपर्यंत वजावट मिळते. ही कर सवलत मिळवण्यासाठी विमा प्रीमियम ३१ मार्च २०२६ पूर्वी भरलेला असणे आवश्यक आहे.

३. अपडेटेड ITR भरण्याची शेवटची संधी- जर तुम्ही आधी भरलेल्या आयकर रिटर्नमध्ये काही चूक केली असेल किंवा काही उत्पन्न दाखवायचे राहिले असेल, तर ITR-U द्वारे रिटर्न अपडेट करता येतो. AY २०२१-२२ (FY २०२०-२१) साठी अपडेटेड रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ आहे.

४. PPF, सुकन्या समृद्धी आणि NPS मध्ये गुंतवणूक- जर तुम्ही जुनी करप्रणाली वापरत असाल, तर अजूनही कर सवलतीसाठी गुंतवणूक करू शकता. तुम्ही PPF, सुकन्या समृद्धी योजना आणि नॅशनल पेन्शन सिस्टम योजनांमध्ये गुंतवणूक करून कर सवलत घेऊ शकता. ही गुंतवणूक ३१ मार्च २०२६ पूर्वी करणे आवश्यक आहे.

५. होम लोन व्याजावर कर सवलत- आयकर कायद्याच्या कलम २४(b) अंतर्गत गृहकर्जावरील व्याजावर कर सवलत मिळते. या अंतर्गत तुम्ही २ लाख रुपयांपर्यंत व्याजावर कर वजावट घेऊ शकता. मात्र चालू आर्थिक वर्षात भरलेले व्याजच वजावटीसाठी ग्राह्य धरले जाईल.