मालामाल करणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या ५ योजना; कर सवलतीचाही लाभ मिळणार, जाणून घ्या..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 15:53 IST2025-09-14T15:46:55+5:302025-09-14T15:53:46+5:30
Post Office Scheme: या योजनांवर करसवलत मिळाल्याने मोठी बचत होते.

Post Office Scheme: तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवायचे असतील आणि त्याचबरोबर चांगला परतावा मिळवायचा असेल, तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वात विश्वासार्ह पर्याय ठरू शकतात. या योजना केवळ तुमच्या गुंतवणुकीचे संरक्षणच करत नाही, तर ७.५% ते ८.२% पर्यंत व्याजदरही देतात. शिवाय, या योजनांवर करसवलत मिळाल्याने बचत अधिक वाढते. चला जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या सहा प्रमुख बचत योजना...
१. पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट (FD)- या योजनेत तुम्ही १, २, ३ किंवा ५ वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. ५ वर्षांच्या FD वर तुम्हाला ७.५% पर्यंत व्याजदर मिळतो. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कलम ८०C अंतर्गत करसवलतीचाही लाभ मिळतो. निश्चित परतावा आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी ही योजना उत्तम आहे.
२. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र- ही योजना विशेषतः महिलांसाठी आहे. गुंतवणुकीची मुदत २ वर्षे असून, व्याजदर ७.५% आहे. किमान १,००० रुपये ते कमाल २ लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते. महिलांसाठी ही बचत वाढवण्याची सुवर्णसंधी आहे.
३. नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (NSC)- ५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची असल्यास NSC हा उत्तम पर्याय आहे. यावर ७.७% व्याज मिळते, जे वार्षिक कंपाउंड आहे. म्हणजेच व्याजावर व्याज वाढत जाते. करसवलत मिळाल्याने ही योजना आणखी फायदेशीर ठरते.
४. वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)- ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी ही योजना आहे. यात ५ वर्षांसाठी गुंतवणूक करता येते व व्याजदर ८.२% पर्यंत आहे. जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवणूक करता येते. या योजनेचा मोठा फायदा म्हणजे तिमाही व्याज मिळते, ज्यामुळे नियमित उत्पन्न सुरू राहते.
५. सुकन्या समृद्धी योजना (SSY)- मुलीच्या भविष्याला सुरक्षित करण्यासाठी ही योजना उत्तम आहे. यात दरवर्षी किमान ₹२५० ते ₹१.५ लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. व्याजदर ८.२% आहे. योजनेची मुदत १५ वर्षे असून, ती २१ वर्षांनी परिपक्व होते. मुलीच्या शिक्षण व लग्नासाठी मजबूत आर्थिक आधार तयार करण्यास ही योजना मदत करते.
६. किसान विकास पत्र (KVP)- लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीसाठी KVP उत्तम पर्याय आहे. यात गुंतवलेले पैसे ११५ महिन्यांत (सुमारे ९.५ वर्षे) दुप्पट होतात. व्याजदर ७.५% आहे. किमान गुंतवणूक ₹१,००० पासून सुरू करता येते. दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीसाठी ही योजना फायदेशीर ठरते.