Post Office ची 'ही' स्कीम २ वर्षांत महिलांना बनवेल श्रीमंत, जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 08:42 AM2024-03-04T08:42:41+5:302024-03-04T08:54:34+5:30

बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिसही ग्राहकांसाठी नवनव्या गुंतवणूकीच्या स्कीम्स आणत असतं. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते.

Post Office Scheme: बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिसही ग्राहकांसाठी नवनव्या गुंतवणूकीच्या स्कीम्स आणत असतं. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. तसंच यात मिळणारे फायदेही उत्तम असतात. सरकारनं सध्या महिलांसाठीही एक विशेष स्कीम सुरू केली आहे. याचा लाभ पोस्टाद्वारेही घेता येतो.

जर महिलांना दोन वर्षांच्या कालावधीत श्रीमंत व्हायचं असेल तर त्या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करू शकतात. सरकार महिलांसाठी महिला सन्मान प्रमाणपत्र योजना राबवत आहे. जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी किंवा पत्नीसाठी किंवा अन्य कोणासाठी गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना उपयुक्त ठरू शकते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत महिला जास्तीत जास्त २ लाख रुपये गुंतवता येतात.

महिला सन्मान प्रमाणपत्र स्कीमचा लाभ पोस्ट ऑफिसद्वारे देखील घेता येऊ शकतो. पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्यानं महिलांना कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना करावा लागणार नाही. यामध्ये तुम्हाला हमखास परतावा मिळेल. या योजनेअंतर्गत महिला २ वर्षांसाठी जास्तीत जास्त २ लाख रुपये जमा करू शकतात. तुम्हाला दोन वर्षांत गुंतवणुकीवर ७.५ टक्के निश्चित व्याजदर मिळेल.

सरकारी योजनांच्या माध्यमातून महिला बचत करून स्वावलंबी होऊ शकतील. या योजनेत जमा होणाऱ्या पैशांवरही सरकार करमाफी देत ​​आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास सर्व महिलांना करसवलत मिळेल. या योजनेअंतर्गत, १० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलीही येथे त्यांचं खातं उघडू शकतात.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत, दोन वर्षांच्या कालावधीसाठी ७.५ टक्के दरानं व्याज दिलं जाईल. तुम्ही एकदा २ लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला पहिल्या वर्षी १५,००० रुपये आणि दुसऱ्या वर्षी १६,१२५ रुपये परतावा मिळेल. म्हणजेच तुम्हाला दोन वर्षांत २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर योजनेअंतर्गत ३१,१२५ रुपये व्याज उत्पन्न मिळेल.

नियमांनुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला आंशिक पैसे काढण्याची परवानगी मिळते. अशा परिस्थितीत तुम्ही जमा केलेल्या रकमेपैकी ४० टक्के रक्कम काढू शकता. म्हणजेच तुम्ही २ लाख रुपये जमा केले असतील तर एक वर्षानंतर तुम्ही ८० हजार रुपये काढू शकता.

या योजनेचं उद्दिष्ट फक्त महिलांना अधिक व्याज देऊन बचत करून त्यांचे पैसे वाढविण्यात मदत करणं आहे. कोणत्याही वयोगटातील महिला यामध्ये गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलीचे पालक त्यांच्या नावावर या योजनेत गुंतवणूक करू शकतात. सध्या त्यावर ७.५ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे, परंतु सरकारनं यादरम्यान व्याजदरात बदल केला तरी आधीच उघडलेल्या खात्यावर त्याचा परिणाम होणार नाही. म्हणजेच खातं उघडल्याच्या तारखेपासून कोणताही व्याजदर ठरवला गेला असला तरी तो मुदतपूर्तीपर्यंत लागू राहणार आहे.