मोदींची भेट इलॉन मस्क यांना फळली, नेटवर्थमध्ये ८,१६,३१,६४,०७,५०० रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 10:30 AM2023-06-21T10:30:57+5:302023-06-21T10:39:38+5:30

इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला लवकरात लवकर भारतात येण्यास तयार असल्याचं मस्क यांनी मोदी यांच्या भेटीनंतर सांगितलं.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर त्यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला लवकरात लवकर भारतात येण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मस्क यांनी व्यक्त केलेल्या विश्वासानंतर टेस्ला कंपनीच्या शेअरनं रॉकेट स्पीड पकडला. कंपनीच्या शेअर्समध्ये ५.३४ टक्क्यायंची वाढ झाली. यामुळे मस्क यांच्या नेटवर्थमध्ये ९.९५ अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास ८,१६,३१,६४,०७,५०० रुपयांची वाढ झाली.

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार त्यांची एकूण संपत्ती आता २४३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात मस्क यांनी या वर्षाच्या अखेरीस आपली कंपनी नवीन प्रकल्पासाठी जागा निश्चित करेल, असं म्हटलं होतं.

नव्या प्रकल्पासाठी भारत हे चांगलं ठिकाण असल्याचंही ते म्हणाले होते. मोदी आणि मस्क यांच्या भेटीनंतर टेस्लाची भारतात गुंतवणूक करण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला टेस्लानं भारतात एन्ट्रीची योजना सोडण्याचा निर्णय घेतला होता. भारतात वाहनांवर आयात कर खूप जास्त असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण अलीकडच्या काळात, कंपनी पुन्हा एकदा भारतात आपल्या शक्यता पडताळून पाहत आहे.

टेस्लानं भारतात प्रकल्प सुरू करावी अशी सरकारची इच्छा आहे. परंतु यासाठी मोठ्या प्रमाणात कर कपातीची टेस्लाची मागणी आहे. यावरच सर्व मोठी समस्या आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्या झालेल्या भेटीनंतर Teslaconomics नं भारतात गुंतवणूक करू शकतो असं ट्वीट केलंय.