PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना दिलासा; ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 22 मे पर्यंत वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 01:35 PM2022-03-29T13:35:56+5:302022-03-29T13:43:31+5:30

PM Kisan Scheme: पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास 12.53 कोटी शेतकरी नोंदणीकृत आहेत.

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खरंतर, केंद्र सरकारने ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विहित मुदत वाढवली आहे, जी या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य करण्यात आली आहे.

पीएम किसान पोर्टलवरील अद्ययावत माहितीनुसार, आता ही प्रक्रिया 22 मे 2022 पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते. यापूर्वी अंतिम तारीख 31 मार्च 2022 होती.

दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास 12.53 कोटी शेतकरी नोंदणीकृत आहेत. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्यासाठी ही खूप दिलासादायक बातमी आहे.

सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. त्याची पूर्तता केल्याशिवाय योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळणार नाही.

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत 10 हप्ते वितरित केले आहेत आणि पुढचा म्हणजे 11 वा हप्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कधीतरी शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो, परंतु त्यासाठी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

सरकारने दिलेला 2000 रुपयांचा हप्ता मिळण्यास उशीर होऊ नये असे तुम्हालाही वाटत असेल तर शेवटच्या तारखेची वाट न पाहता आजच ही प्रक्रिया पूर्ण करा.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये ट्रान्सफर केले जातात.

विशेष म्हणजे, भारत सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले होते. मात्र, हे काही दिवसांसाठी थांबवण्यात आले असले तरी आता ते अधिकृत वेबसाइटवर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. घरबसल्या तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीनेही हे महत्त्वाचे काम सहज पूर्ण करता येते.

सरकारने केलेल्या मोठ्या बदलांतर्गत आता या योजनेसाठी नवीन नोंदणी करताना रेशनकार्ड क्रमांक देणे बंधनकारक होणार आहे. याशिवाय दस्तऐवजाची पीडीएफ प्रतही ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करावी लागेल. जर तुम्ही पीएम किसान योजनेंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली असेल तर अर्जदारासाठी रेशन कार्ड नंबर अपलोड करणे खूप महत्वाचे असेल.

सरकारने केलेल्या बदलांनुसार आता आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्ही हे काम अजून केले नसेल तर आजच करा. असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुमच्या हप्त्याची रक्कम मिळण्यात समस्या निर्माण होऊ शकतात.