'हे' आहेत मालदीवच्या नाकी नऊ आणणारे ईज माय ट्रिपचे पिट्टी ब्रदर्स, अशी सुरू केलेली कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 08:36 AM2024-01-13T08:36:13+5:302024-01-13T09:12:19+5:30

EaseMyTrip ने मालदीवला मोठा धक्का दिला. त्यांनी मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केले.

मालदीवच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर #BoycottMaldives ट्रेंड करत आहे. तर यानंतर मालदीवच्या (Maldives) समस्या वाढल्या आहेत. दरम्यान, EaseMyTrip ने मालदीवला मोठा धक्का दिला. EaseMyTrip नं मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केले. या ट्रॅव्हल कंपनीचे सीईओ आणि सह-संस्थापक निशांत पिट्टी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिली.

दरम्यान, Ease My Trip ने मालदीवचे सर्व बुकिंग रद्द केल्याची घोषणा आणि सोशल मीडियावर मालदीववर भारतीयांनी बहिष्कार टाकल्याच्या बातम्यांमुळे मालदीव असोसिएशन ऑफ ट्रॅव्हल एजंट्स अँड टूर ऑपरेटर्सनं (MATATO) गुडघे टेकले आहेत. त्यांनी इज माय ट्रिपकडे बुकिंग पुन्हा सुरू करण्याचं आवाहनही केलं होतं.

असोसिएशननं आता Ease My Trip चे सीईओ निशांत पिट्टी यांना पत्र लिहून त्यांच्या प्लॅटफॉर्मवर पुन्हा मालदीवसाठी बुकिंग सुरू करण्याची विनंती केली आहे. आज कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या Ease My Trip ची सुरुवात खूपच रंजक होती. ही देशातील दुसरी सर्वात मोठी ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी कशी बनली ते आपण आज जाणून घेऊ.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही एजन्सी निशांत, रिकांत आणि प्रशांत पिट्टी या तीन भावांनी मिळून सुरू केली. निशांत आणि रिकांत पिट्टी, भावांमध्ये सर्वात लहान, सुरुवातीच्या काळात चित्रपट डाउनलोड करायचे. ते चित्रपटांच्या सीडी बनवून मित्रांना विकायचे. पिट्टी बंधूंचे वडील कोळशाचे व्यापारी होते. तिन्ही भाऊ नवी दिल्लीत एका सामान्य घरात लहानाचे मोठे झाले.

या एजन्सीची सुरुवात त्यांनी २००८ मध्ये केली. निशांत पिट्टी त्यावेळी कॉलेजच्या पहिल्या वर्षात होते. तर रिकांत पिट्टी हायस्कूलमध्ये होते. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी काही सहलींचे नियोजन केलं होतं जे किफायतशीर होते. यामुळे दोघेही आपल्या कुटुंबात प्रसिद्ध झाले. यानंतर त्यांचे मित्र आणि नातेवाईकही त्याच्यासोबत सहलीचं नियोजन करू लागले. अशा रीतीने फ्लाइट तिकिट बुक करताना थोडं कमिशन घेऊन त्यांना चांगला पॉकेटमनी मिळू लागला.

तिन्ही भावांनी मिळून नंतर ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली. त्यांनी ऑफलाइन आणि ऑनलाइन मार्केटिंग स्ट्रॅटजीद्वारे हवाई तिकीट बुक करणं आणि टूर पॅकेजेस विकणं सुरू केले. तिघांच्या सततच्या मेहनतीचं फळ मिळालं आणि त्यांना यश मिळाले. तीन भावांमध्ये प्रशांत हा सर्वात अभ्यासू होता. तो आयआयटी-मद्रासमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता.

आज Easy My Trip ची कमाई कोट्यवधी रुपये आहे. २०२१ मध्ये, Ease My Trip ही भारतीय शेअर बाजारात लिस्ट होणारी पहिली भारतीय ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी ठरली. ७५०० कोटींहून अधिक बाजार भांडवल असलेली ही भारतातील दुसरी सर्वात मोठी ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी म्हणून उदयास येत आहे.