पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या दरात 10 तर नेपाळमध्ये 11 रुपयांनी घट, भारतात अजूनही 106 रुपयांपर्यंत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 01:22 PM2022-08-09T13:22:12+5:302022-08-09T13:29:57+5:30

Petrol Diesel Prices: भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही मोठी कपात झालेली नाही.

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या होत्या. तसेच, जगात कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या होत्या. मात्र, आता कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे.

याचाच परिणाम पाकिस्तान आणि नेपाळसारख्या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. दरम्यान, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही मोठी कपात झालेली नाही.

9 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या दरानुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे. तर दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 89.92 रुपये आहे. याचबरोबर, मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106 रुपयांपेक्षा जास्त आहे.

या दरम्यान कंपन्यांनी कोणतीही वाढ किंवा कपात केलेली नाही. अशा स्थितीत कच्च्या तेलाच्या बॅरलच्या किमती कमी झाल्या असूनही पाकिस्तानसारख्या देशात इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे भारतीय इंधन कंपन्यांचा तोटा होत असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे, globalpetrolprices.com च्या डेटानुसार, जर आपण पाकिस्तानबद्दल बोललो, तर 20 जून रोजी तेथे एक लिटर पेट्रोलची किंमत भारतीय चलनात 86.71 रुपये होती. 1 ऑगस्ट 2022 च्या किमतींबद्दल बोलत असताना, पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत भारतीय चलनात 76.46 रुपये होती.

पाकिस्तानशिवाय, नेपाळमध्येही पेट्रोलच्या दरात घट झाली आहे. 20 जून रोजी नेपाळमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत भारतीय चलनात 124.27 रुपये होती. तर 1 ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत भारतीय चलनात 113.94 रुपये झाली होती.

भूतानमध्ये पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 20 जून रोजी भूतानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत भारतीय चलनात 92.08 रुपये होती. तर 1 ऑगस्टच्या किमतीनुसार भूतानमध्ये पेट्रोल भारतीय चलनात 101.30 रुपये झाले आहे. त्याचबरोबर जगातील विविध देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तफावत आहे.

याचे कारण तेथे लावले जाणारे कर आणि अनुदान आहे. यासोबतच भारतीय पेट्रोल कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे की, एप्रिल-जून तिमाहीत त्यांच्या तोट्यात लक्षणीय वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या या पहिल्या तिमाहीत कंपन्यांना 18,480 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचीही माहिती देण्यात आली आहे.